कोणतीही कला ही निसर्गाशी तादात्म्य पावलेली असते. शास्त्रीय संगीतही त्याला अपवाद नाही. त्यामुळे संगीततज्ज्ञांनी ऋतूनुसार रागांची रचना केली आहे. पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात ‘मल्हार’ राग ऐकविला जातो. बाहेर पाऊस बरसत असताना हा राग ऐकणे एक विलक्षण अनुभव असतो. कल्याणकरांनी गेल्या शनिवारी त्याचा अनुभव घेतला. शहरातील फणसे सभागृहात ‘मल्हार महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
सुर आणि ताल याचा मेळ जमून आला की शरीरच काय मनही डोलायला लागते. सूख असो वा दु:ख सुरांद्वारे त्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने अभिव्यक्त होत असतात. बाहेर पाऊस आणि सभागृहात ताल आणि सुरांची युती रसिकांची मने रिझवीत होती. मल्हार हा राग पाऊस पडावा यासाठी आळवला जातो. या रागामुळे आकाशात मेघ दाटून येऊन पावसालाही बरसावेसे वाटते. रसिकांनीही ‘क्या बात है’ अशी उत्स्फूर्त दाद देऊन कलावंतांचे कौतुक केले. शास्त्रीय संगीत आणि उपसंगीतात ‘मल्हार’ या रागाला अधिक महत्त्व दिले गेले आहे. गेली चार वर्षे संगीत सभा ही संस्था ‘मल्हार महोत्सव’ आयोजित करण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र योग जुळून येत नव्हता. यंदा सर्व बाबी जमल्या. महोत्सव अतिशय उत्तम झाला. कलाकारांसोबत रसिकांनीही भरभरून दाद दिली. बाहेर पाऊस असतानाही सभागृह १५०-२०० रसिकांनी गच्च भरले होते. प्रत्येकजण सुराचा आनंद घेताना दिसत होते. कला ही नेहमीच रसिकांच्या मनाचा सतत ठाव घेत असते. रसिकांच्या आनंदनिर्मितीसाठीच जणू काही कलाकारांचा जन्म झाला आहे, असे कलाकारांना सतत वाटत असते. या नात्यातूनच उत्तम कलाकार आणि रसिक यांची घट्ट मैत्री आपणास बघावयास मिळते. गुरुदास कामत आणि अर्चना कान्हेरे या ज्येष्ठ गायक कलावंतांनी मल्हारचे विविध रंग उलगडून दाखविले. गुरुदास कामत यांनी रामदासी मल्हारमध्ये ‘कितीक आईरे’ ही विलंबित एकतालातील बंदीश सादर केली. त्याचप्रमाणे ‘मधुरंजनी चमकन लागी रे बिजुरी’ ही छोटा ख्याल बंदीश सादर केली. त्यानंतर अर्चना कान्हेरे यांनी ‘सूर मल्हार’ या रागातील ‘बरसन लागी रे’ ही विलंबित एकताल व ‘बरसन लागी रे’ हीच बंदीश वापरून ‘द्रूत’ ताल सादर केला. राग अभोगी कानडामध्ये मध्य लय त्रितालातील ‘सावन मे हा बरसन लागी’ ही बंदीश सादर केली. त्यानंतर राग प्रतीक्षामधील एक बंदीश सादर केली. त्यानंतर एक भजन गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. शास्त्रीय संगीताने या मैफलीत अनोखे रंग भरले होते.
प्रत्येकबंदिशीनंतर रसिक प्रेक्षकही भरभरून दाद देत होते. एखादी हरकत आवडली तरी ‘क्या बात है’, असे मधूनच साऱ्या सभागृहातून ऐकू येत होते. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ७ वाजता झाली, मात्र कार्यक्रम इतका रंगला की रात्रीचे १० कधी वाजले हे कलावंत आणि रसिकांना कळले नाही. निवेदनाशिवाय कार्यक्रमात रंग भरले जात नाहीत. जेव्हा निवेदकही कलावंत असतो, तेव्हा तो अतिशय समर्पक आणि अचूक वर्णन करीत असतो. त्याचा प्रत्यय चंद्रशेखर वढे यांच्या निवेदनातून आला. अर्चना कान्हेरे यांना ऋग्वेद देशपांडे यांनी तबला तर अनिरुद्ध गोसावी यांनी संवादिनीची साथ केली. गुरुदास कामत यांना स्नेहलकुमार धानापूरकर यांनी तबला तर जयंत फडके यांनी संवादिनीची साथ केली.