बदलापूरः शेजारी मित्राच्या घरी जेवण मागितले, मात्र मित्राच्या पत्नीने जेवण देण्यास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून त्यांच्यी एका साडे चार वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरात समोर आला. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसानी वेगाने तपासाची चक्रे फिरवत मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील उमरेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चिमुकल्या मुलीची सुटका केली असून आरोपी रंजीत धुर्वे याला अटक केली आहे. पोलिसांनी अवघ्या १७ तासात आरोपीला अटक केली असून मुलीची सुखरूप सुटका झाल्याने बदलापुरातून पोलिसांचे कौतुक होते आहे.

बदलापूर पश्चिमेत एका बांधकामाच्या ठिकाणी आरोपी रंजीत धुर्वे हा मजूर म्हणून काम करत होता. शेजारीच कामगारांसाठी असलेल्या कच्च्या घरात मजूर वास्तव्यास होते. येथे एक नेपाळी दाम्पत्य आपल्या दोन जुळ्या मुली आणि सात वर्षीय मुलासोबत राहत होते. तीन महिन्यांपूर्वी येथे कामासाठी आलेल्या रंजीत याची नेपाळी कुटुंबाशी ओळख होती. त्यामुळे अनेकदा त्यांच्या घरी येणेजाणे होते. मंगळवारी दुपारी कामावरून आल्यानंतर त्याने नेपाळी कुटुंबियांच्या घरी गेला. तिथे मित्राच्या पत्नीकडे जेवण देण्याची मागणी केली. मात्र महिलेने जेवण देण्यास नकार दिला. त्यामुळे काही वेळाने रागातून रंजीत धुर्वे याने त्या मित्राच्या एका मुलीला गोड बोलून अपहरण करून घेऊन गेला. मुलीची आई घरी आल्यानंतर तीला हा प्रकार कळला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या वतीने मुलीचा आणि आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव, अशोक कोळी यांच्या संयुक्त तपासात सीसीटीव्ही चित्रण, माहिती आणि आरोपीचा माग काढत असताना आरोपी मध्यप्रदेशातील मोरडोंगरी येथे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे उल्हासनगर गुन्हे शाखेच्या घटक चारच्या पोलिसांनी अंबरनाथ, बदलापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने तात्काळ मध्य प्रदेशातील उमरेठ पोलीस ठाण्यात जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी रंजीत धुर्वे याला अटक केली. त्याचवेळी चिमुकलीची सुटकाही केली. अवघ्या १७ तासात पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेऊन केलेल्या कामगिरीबद्दल पोलिसांचे शहरात कौतुक होते आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिक्षाचालकाची सतर्कता

आरोपी रंजीत धुर्वे याने चिमुकलीला गोड बोलून खाऊचे अमिष दाखवून तीला रिक्षातून रेल्वे स्थानकाकडे नेले. या प्रवासात रिक्षा चालकाला संशय आल्याने त्या रिक्षाचालकाने सतर्कता दाखवत आरोपीचे छायाचित्र घेतले. त्याच छायाचित्राचा पुढे तपासात उपयोग झाला. रेल्वे पोलीसांनी आरोपीची तात्काळ माहिती दिली. गोरखपूर एक्सप्रेसमध्ये आरोपी चढताना दिसला. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे सोपे झाले.