तरुणीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथच्या कानसई गाव परिसरात घडला. हत्या झालेली तरुणी दिवा येथे राहणारी असून आत्महत्या करणारा तरुण अंबरनाथचा रहिवासी होता. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे.

अंबरनाथ पूर्वेतील कानसई गावात राहणाऱ्या नत्राम वर्मा (२५) याचे दिवा येथील रहिवासी अचल महल्ले या विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती आहे. ती दिवाळीला त्याच्या घरी राहायला आली होती. यानंतर त्यांच्यात वाद होऊन नत्रामने तिची गळा आवळून हत्या केली आणि नंतर स्वत: गळफास घेतला अशी माहिती आहे. तरुणीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने तिची हत्या किमान ३ दिवस आधी झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नत्राम तीन दिवस मृतदेहाजवळ होता का, असा संशयही व्यक्त केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी रात्री नत्रामने स्वत: तरुणीच्या कुटुंबीयांना फोन करून तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आणि मग स्वत: आत्महत्या केली. मुलीच्या नातेवाईकांनी यानंतर कानसई गावात धाव घेतली आणि हा सगळा प्रकार उघड झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नत्रामच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असून अद्याप त्याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.