ठाणे : भिवंडी येथील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर पतंगाच्या मांजाने गळा चिरल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. संजय हजारे (४७) असे मृताचे नाव असून, याप्रकरणाची नोंद भिवंडी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
उल्हासनगर येथे संजय हजारे वास्तव्यास होते. रविवारी सांयकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ते भिवंडी येथून त्यांच्या दुचाकीने उल्हासनगरच्या दिशेने जात होते. त्यांची दुचाकी बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर आली असता, पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याभोवती गुंडाळला गेला, त्यामुळे त्यांचा गळा मांजाने चिरला गेला.
धारदार मांजामुळे त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती भिवंडी शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी मांजा जप्त केला असून याप्रकरणाची नोंद भिवंडी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.