भावेश नकाते हा तरुण लोकलमधून पडून मरण पावल्याच्या दुर्दैवी घटनेला दोन दिवस उलटत नाहीत; तोच डोंबिवलीत राहणाऱ्या आणखी एका प्रवाशाचा मंगळवारी रात्री कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला. नितीन चव्हाण (४०) असे मरण पावलेल्या प्रवाशाचे नाव आहे.
वाढत्या गर्दीमुळे लोकलमधून पडणाऱ्या प्रवाशांच्या घटना वारंवार घडू लागल्या असून शुक्रवारी भावेश नकाते याच्या मृत्यूनंतर मंगळवारी सकाळी नरेश पाटील या प्रवाशाचा मृत्यू झाला होता. अपघातांची ही मालिका मंगळवारी रात्रीही सुरू होती. सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलमधून नितीन चव्हाण प्रवास करीत होते. मात्र गर्दीमुळे कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चर्चगेट येथील एका महाविद्यालयात ते सुरक्षारक्षक होते. कामावर जाण्यासाठी निघाले असताना हा अपघात झाला. गेल्या पाच दिवसांमधील रेल्वे अपघातातील हा तिसरा बळी ठरला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2015 रोजी प्रकाशित
लोकलमधून पडून प्रवाशाचा मृत्यू
भावेश नकाते हा तरुण लोकलमधून पडून मरण पावल्याच्या दुर्दैवी घटनेला दोन दिवस उलटत नाहीत
Written by रत्नाकर पवार

First published on: 03-12-2015 at 05:16 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man dies after fall from crowded mumbai local train