ठाणे : ठाण्यातील कोपरी भागात भर चौकात एकावर तलवारी आणि चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात जयेश पिंगूरकर, विकास जयस्वाल आणि मनीष जयस्वाल या तिघांविरोधात गुन्हा दाखल असून यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हल्लेखोर अभिलेखावरील गुन्हेगार असून भर चौकात हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पूर्व वैमन्यस्यातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. हल्लेखोरांवर यापूर्वी हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत.
कोपरी येथे अष्टविनायक चौक आहे. हा चौक नेहमी गजबजलेला असतो. त्यामुळे येथून ठाणे पूर्व (कोपरी) आणि पश्चिमेला जाणाऱ्या वाहनांचा वाहतुक या चौकातून नेहमी होत असते. कोपरी येथील चेंदणी कोळीवाडा भागात भावेश वाघुले (२८) हा त्याच्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. रविवारी रात्री ७.४५ वाजता भावेश वाघुले हा अष्टविनायक चौकात आला असताना, जयेश, विकास आणि मनीष त्याठिकाणी आले. त्यावेळी त्यांच्या हातामध्ये तलवारी, चाकू होते. त्यांनी भावेश याच्यादिशेने जात त्याच्यावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला केला. यात त्याच्या डोक्यावर, दोन्ही हातावर आणि मनगटाला गंभीर दुखापत झाली.
जीव वाचविण्यासाठी भावेश येथील एका पक्ष कार्यालयात शिरला. अखेर हल्लेखोर तेथून निघून गेले. भावेश याला तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या शरिरातून अति रक्तस्त्राव झाल्याने त्याच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. हल्लेखोर निघताना तलवारी आणि चाकू हवेत भिरकावत होते. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. हल्लेखोर हे अभिलेखावरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी हाणामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यातील दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पूर्व वैमन्यस्यातून हा हल्ला झाला आहे.
भावेश आणि हल्लेखोर यांच्यामध्ये यापूर्वी देखील वादाचे प्रसंग झाले होते. त्यावेळी भावेश याच्या नातेवाईकांनी त्याला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले होते. परंतु शाब्दिक वाद झाल्याने त्याने याकडे दुर्लक्ष केले होते. दरम्यान, त्याच्यावर हा हल्ला झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी जयेश, विकास आणि मनीष विरोधात आता कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता (भा. न्या. सं.) २०२३ चे कलम १०९, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.