Thane, Political Mangalagaur ठाणेः दहीहंडी पाठोपाठ आता मंगळागौर सोहळेही राजकीय पक्षांसाठी प्रभावी व्यासपीठ ठरत आहेत. ठाणे शहरात गेल्या आठवडाभरापासून विविध पक्षांकडून मोठ्या प्रमाणात सामूहिक मंगळागौर कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. येत्या काही महिन्यांत ठाणे महापालिका निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेता, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मंगळागौरीचा वापर मोर्चेबांधणीसाठी केला जात असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

गेले अडीच ते तीन वर्षांपासरून राज्याचे राजकारण हे ठाणे जिल्ह्याभोवती फिरत आहे. राज्याच्या या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि अजूनही घडत आहे. त्यामुळे सध्या राज्यातील या सत्ता संघर्षात ठाणे जिल्हा हा केंद्र बिंदू बनला आहे. कोणताही सण – उत्सवाला राजकीय वळण ठाणे जिल्ह्यात दिले जाते. ठाण्यात दहीहंडी असो मंगळागौर किंवा नवरात्रौत्सव या सणांसोबत राजकीय समीकरण जोडलेली दिसून येतात. येत्या काही महिन्यात ठाणे महापालिका निवडणूका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याअनुषंगाने मतदारांना आकर्षिकत करण्यासाठी यंदा ठाणे शहरात विविध पक्षांकडून दहीहंडीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आल्याचे दिसून आले.

लाखोंच्या पारितोषिकांचा वर्षाव त्यासह विविध संकल्पांवर हा दहीहंडी उत्सव पार पडला होता. त्यापाठोपाठ, गेल्या आठवड्याभरापासून ठाणे शहरात विविध पक्षाच्या मार्फत मंगळागौर कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमात त्या त्या पक्षाचे बडेबडे नेते उपस्थित राहून विविध घोषणाही देत आहेत. नुकताच ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये माजी महापौर आणि शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खेळ मंगळागौरीचा हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी लाडकी सुन योजनेची घोषणा केली.

शनिवार, २३ ऑगस्ट रोजी याच गडकरी रंगायतनमध्ये भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या विश्वास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मंगळागौर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात महिलाच्या स्पर्धा घेण्यात आल्या तसेच आकर्षक असे पारितोषिके ठेवण्यात आली होती. तसेच शिवसेना (ठाकरे गट) शिवसेना ठाणे जिल्हा शाखा महिला आघाडी यांच्या वतीने आज, रविवार सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान महामंगळागौर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महा मंगळागौर सोहळ्याला रश्मी ठाकरे हजेरी लावणार आहेत. या महा मंगळागौर सोहळ्याची ब्रँडींग शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या वतीने ठाणे स्थानक परिसरात बॅनर लावून तसेच समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणात करण्यात आली आहे.