नाशिककडे जाणाऱ्या ठाणेकरांना फटका; प्रवाशांत नाराजी
मुंबई ते मनमाडदरम्यान धावणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसचा ठाणे स्थानकातील थांबा शनिवारपासून बंद करण्यात आल्याने ठाण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. नाशिककडे जाणाऱ्या ठाणेकरांना आता लोकलने कल्याण गाठून राज्यराणी एक्स्प्रेस पकडावी लागत आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय हा थांबा बंद केल्याने प्रवासी संघटनांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे.
मुंबईहून मनमाडला जाणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा मिळावा, अशी गेली अनेक वर्षांची मागणी आहे. लोकप्रतिनिधींकडूनही या थांब्यासाठी पाठपुरावा सुरू होता. प्रवाशांचा दबाव वाढू लागल्याने आढेवेढे घेत रेल्वे प्रशासनाने ठाणे रेल्वे स्थानकात तात्पुरता थांबा सुरू करण्याचा निर्णय मध्यंतरी घेतला. मात्र शनिवारपासून तो कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा थांबा बंद करण्यात आल्याची उद्घोषणा ठाणे स्थानकात देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्याहून मनमाडच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडत आहे. या प्रवाशांनी कल्याण स्थानकातून प्रवास करावा, अशी उद्घोषणा केली जात आहे. ठाणे स्थानकाचे व्यवस्थापक महिधर यांनी राज्यराणीचा थांबा बंद केल्याचे स्पष्ट केले. तसेच हा थांबा पुन्हा कधी सुरू होणार याची कोणतीच माहिती देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या शेकडो गाडय़ांना ठाणे स्थानकात थांबा दिला जात असताना राज्यातील अंतर्गत भागात सुरू असलेल्या रेल्वे वाहतुकीला ठाण्याचा थांबा नाकारण्यात आल्याने या प्रश्नावरून राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राज्यराणी एक्स्प्रेसला तात्पुरता थांबा दिल्यानंतर रेल्वे स्थानक परिसरात काही लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रयत्नामुळे थांबा सुरू झाल्याचे बॅनर्स लावले होते. पोस्टरबाजी करणारे लोकप्रतिनिधी थांबा बंद झाल्यानंतर कुठे गेले, असा सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. ‘महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गाडय़ांच्या थांब्यासाठी मागणी करावी लागते, तर महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यांमध्ये जाणाऱ्या गाडय़ांना कोणत्याही मागणीशिवाय ठाण्यात थांबा दिला जातो. हे योग्य नाही,’ अशी प्रतिक्रिया विनायक थत्ते या प्रवाशाने दिली.

राज्यातील अन्य गाडय़ांचे थांबेही बंद करणार?
राज्यराणी एक्स्प्रेसप्रमाणे तात्पुरता थांबा असलेल्या गाडय़ांमध्ये लातूर एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस या गाडय़ांचाही समावेश असून भविष्यात त्याही थांबवल्या जाण्याची शंका येत आहे. कोणतेही ठोस कारण न देता गाडय़ांचे थांबे बंद करण्याचा सपाटा रेल्वे प्रशासनाने लावला आहे. या गाडय़ांचे ठाणे स्थानकातून आरक्षणही मिळत नसल्याने हे थांबे असून नसल्यासारखेच आहेत.
– राजेश घनघाव, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ