डोंबिवली : मनोविकाराची बाधा झालेले रुग्ण मानसोपचाराने बरे होतात. पण दरम्यानच्या काळात त्यांचे मनोबल प्रचंड खालावलेले असते, मनातील अस्वस्थता त्यांना स्थिर बसू देत नाही. यातून आरोग्याच्या अन्य समस्याही उद्भवतात. अशा मनोविकारातून बरे झालेले रुग्ण म्हणजेच शुभार्थी आणि त्यांचे कुटुंबीय म्हणजे शुभंकर या दोघांना सावरण्याचे काम डोंबिवलीतील मनोदय ट्रस्ट गेल्या १७ वर्षांपासून करत आहे. आता या शुभार्थींसाठी कायमस्वरूपी निवासी केंद्र उभारण्याचा, स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांसाठी काळजीवाहक केंद्र सुरू करण्याचा ट्रस्टचा मनोदय आहे.

मनोविकाराच्या विविध व्याधी असलेल्या शुभार्थींसाठी (बरा झालेला मनोविकार रुग्ण) आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी (शुभंकर) यांच्यासाठी सन २००३ पासून सामाजिक सेवेचा भाग म्हणून मोफत स्वमदत गट चालविले जातात. या स्वमदत गटात ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये यांच्यासह परिसरातील विविध मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार घेत असलेले, त्यामधून बरे झालेले अनेक शुभार्थी, शुभार्थींच्या पुढील भवितव्याविषयी चिंतेने ग्रासलेले नातेवाईक सहभागी आहेत.

आपल्या शुभार्थीचे पुढे काय होणार या चिंतेने ग्रासलेले पालक स्वमदत गटात आल्यापासून मनमोकळे, चिंतामुक्त झाले आहेत. या स्वमदत गटाच्या प्रभावी कामामुळे दुर्लक्षित असलेला शुभार्थी समाजाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. शुभंकरानंतर शुभार्थीचे निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी पुनर्वसन निवारा केंद्र, स्मृतिभ्रंश रुग्णांच्या कुटुंबीयांचा विचार करून मनोदय ट्रस्टला दिवसभराचे निवारा केंद्र हे दोन महत्त्वाकांक्षी भविष्यकालीन प्रकल्प हाती घ्यायचे आहेत. त्यासाठी मनआरोग्य विकासासाठी मनोदय ट्रस्टला आर्थिक आधार हवा आहे.