डोंबिवली : कल्याण, डोंबिवली परिसरातील बेरोजगार तरूण, त्यांच्या पालकांना हेरून त्यांना आपली रेल्वे प्रशासनात उच्च पदावर ओळख आहे. असे सांगून त्यांच्याकडून रेल्वेत तिकीट तपासणीस म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून लाखो रूपये उकळून नंंतर त्यांना नोकरी न लावता त्यांची फसवणूक करणाऱ्या डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर भागातील एका ३७ वर्षाच्या इसमाला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

या इसमाने मागील काही महिन्यांंच्या कालावधीत अनेक बेरोजगार तरूण, त्यांच्या पालकांना फसवून पैसे उकळल्याच्या तक्रारी आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात अशाप्रकारची एक तक्रार दाखल होती. अशीच तक्रार आता कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्यात मोहने येथील एका बेरोजगार तरूणाने दिली आहे. विशाल वसंत निवाते (३७) असे फसवणूक करणाऱ्या इसमाचे नाव आहे. तो डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर भागातील गंगेश्वर टाॅवरजवळील लक्ष्मी प्रेरणा इमारतीत राहतो.

मोहने येथे राहणारा एक बेरोजगार तरूण प्रथमेश सुरेश मोरे (२५) यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी विशाल वसंत निवाते याच्या विरुध्द फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. बेरोजगार तरूणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना फसवायचा उद्योग वसंतने सुरू केला होता. आता तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

तक्रारदार प्रथमेश मोरे यांना डोंंबिवलीतील वसंत निवाते हे रेल्वेत तरूणांना नोकरीला लावतो असे समजले होते. यावरून ते आठ महिन्यापूर्वी वसंत निवाते यांच्या संपर्कात आले. मोबाईलवरून त्यांचे बोलणे सुरू होते. प्रथमेश हे कल्याणमधील मोहने येथील यादवनगर भागात कुटुंबीयांसह राहतात. वसंतने प्रथमेश यांना आपण तुला रेल्वेमध्ये नोकरीला लावतो. आपली रेल्वेत ओळख आहे, असे आश्वासन दिले. प्रथमेश यांचा विश्वास संपादन केल्यानंतर नोकरी लावण्याच्या कामासाठी वसंत निवाते याने फोन पे आणि गुगल पे उपयोजनवरून टप्प्याने एकूण पाच लाख रूपये उकळले.

पैसे दिल्यानंतर प्रथमेश मोरे यांनी वसंत निवाते यांच्यामागे नोकरीचे नियुक्तीचे पत्र देण्यासाठी तगादा लावला. सुरूवातीला त्याने वेळकाढूपणाची उत्तरे दिली. पाच लाखाची रक्कम दिल्याने प्रथमेश अस्वस्थ होता. प्रथमेश दररोज वसंतला संपर्क करून नोकरीचे नियुक्त पत्र देण्याची मागणी करू लागले. नोकरी देणार नसाल तर पैसे परत करा असे सांगू लागले. त्यानंतर वसंतने प्रथमेशचा तगादा नको म्हणून स्वताचा मोबाईल फोन कायमचा बंद केला. यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रथमेशने आपणास नोकरी नाहीच, पण आपले पैसेही बुडाल्याचे समजल्यावर खडकपाडा पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात तक्रार केली.

साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बाकल याप्रकरणाचा तपास करत आहेत. वसंत निवातेला अशाच एका फसवणूक प्रकरणात मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मानपाडा पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर खडकपाडा पोलीस प्रथमेश मोरे यांच्या तपासासाठी वसंतचा ताबा घेतील, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. वसंतने पंधराहून अधिक तरूणांची फसवणूक केल्याची चर्चा आहे.