|| ऋषीकेश मुळे

आवक घटल्याने ताज्या फुलांची टंचाई; गुरुपौर्णिमेला स्वस्त पण शिळय़ा गुलाबांची विक्री

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेले आंदोलन तसेच इंधनदरवाढीविरोधात सुरू असलेला मालवाहतूकदारांचा संप याचा मोठा परिणाम ‘फुलांच्या राजा’वर झाला आहे. पुणे तसेच सोलापूर जिल्ह्यातून होणारी ताज्या गुलाबांची आवक निम्म्यावर आल्यामुळे बाजारात गुलाबांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक विक्रेत्यांनी शिळे गुलाब विक्रीस उपलब्ध केले आहेत. यामुळे गुलाबांच्या दरांत घसरण झाली असली तरी, यंदाच्या गुरुपौर्णिमेला गुरुचरणी कमी दर्जाचे गुलाब वाहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूचे ऋण व्यक्त करण्यासाठी शिष्यांकडून गुलाबपुष्पाची भेट दिली जाते. त्यामुळे या दिवशी गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दोन दिवस आधीपासून पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून गुलाबाची मोठी आवक फूलबाजारात होते. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे गुलाबाची पुरेशी आवक बाजारात होऊ शकलेली नाही. राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मालवाहतूक करणाऱ्या वाहनांनाही लक्ष्य करण्यात आल्याने मुंबई, ठाण्यातील बाजारापर्यंत ताजे गुलाब पोहोचू शकलेले नाहीत. परिणामी विक्रेत्यांनी तीन-चार दिवसांपूर्वी आलेला मालातून तजेला धरून असलेल्या फुलांची विक्री आरंभली आहे.

‘दरवर्षी गुरुपोर्णिमेनिमित्त १००० ते १२०० बंचचा माल मुंबई, ठाण्याच्या बाजारात येत असतात. साधारणपणे एका बंचमध्ये २० फुलांचा समावेश असतो. यंदा ही आवक निम्म्यावर आली आहे,’ अशी माहिती पुणे येथील गुलाबाचे घाऊक विक्रेते अमोल हरगुडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. एरवी आवक घटताच कृषीमालाचे दर वधारतात. गुलाबांची परिस्थिती मात्र वेगळी आहे. आवक घटल्याने विक्रेत्यांना जुना साठवणुकीतला गुलाब विकावा लागत आहे. एरवी उत्तम दर्जाचा २० फुलांच्या गुलाबाचा संच १०० रुपयांना विकला जात असे. यंदा दर्जा घसरल्याने हाच संच ६० रुपयांना विकला जात आहे, अशी माहिती ठाण्यातील गुलाब फुलांचे किरकोळ विक्रेते अमित सानप यांनी दिली. दर्जाहीन गुलाब खरेदी करताना ग्राहक कुरकुर करतात. त्यामुळे दर कमी करण्याशिवाय पर्याय नाही, असे सानप यांनी सांगितले. बुधवारीही पुण्याच्या काही भागात आंदोलन सुरू होते. त्यामुळे मुंबई, ठाण्यात पुरेशा प्रमाणात गुलाबाची आवक झालेली नाही, असेही सानप यांनी सांगितले.