ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाचा सोमवार, १ जून रोजी १२२वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्त ग्रंथालयात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा सोहळा रंगणार असून, त्यास प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक आणि संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तर कार्यक्रमामध्ये ‘माझा लेखन प्रवास’ या विषयावर गोडबोले उपस्थितांशी संवाद साधतील.
ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वर्धापन दिनानिमित्ताने ग्रंथालयातील उत्कृष्ट ग्रंथालयसेवक पुरस्काराचे वितरण करण्यात येत असून यंदा हा पुरस्कार दीपक शिर्के यांना देण्यात येणार आहे, तर वा.अ. रेगे उत्कृष्ट वाङ्मयीन पुरस्काराचे वितरणही केले जाईल.
ललित विभागातील पुरस्कार आदिनाथ हरवंदे यांच्या ‘जिगिषा’ आणि क्षितिज कुलकर्णी यांच्या ‘चिंब’ या कादंबऱ्यांना विभागून देण्यात आला आहे. तर ललितेतर विभागात प्रा. डॉ. दाऊद दळवी यांच्या ‘भारतातील मुस्लिम स्थापत्यकला’ या पुस्तकाला सन्मानित करण्यात येणार आहे