ठाणेः भारतात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. या उत्सवाची पंढरी असलेल्या महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकण भागात याचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. राज्य सरकारनेही या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष गणेशोत्सवासाठी वेगळे आहे. पण हा उत्सव फक्त महाराष्ट्रात किंवा भारतात नाही तर परदेशातही उत्साहाने साजरा केला जातो आहे. सातासमुद्रापार स्पेनमधील बार्सिलोना शहरातही मराठी आणि भारतीय मंडळींनी उत्साहात गणेशोत्सव साजरा केला.
युरोपमध्ये शिक्षण, अर्थाजन आणि उद्योग-व्यवसायासाठी आलेल्या मराठी बांधवांना एकत्र आणून संस्कृती आणि परंपरा जपण्याची संधी देणारे उत्सव, परदेशातही मराठीजन जिवंत ठेवून आहेत. यंदा गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्यमहोत्सवाचा दर्जा मिळाल्याने परदेशातील मराठी नागरिकांचा उत्साह आणि आनंद दुणावला असून, स्पेनमधील बार्सिलोना येथील महाराष्ट्र मंडळाने तिसऱ्या यशस्वी गणेशोत्सवाचे आयोजन मोठ्या जल्लोषात केले.
गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी १० वाजता वेदमंत्रोच्चारांच्या गजरात आणि पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने दिलेल्या जागतिक मान्यतेला अभिवादन म्हणून देखावा उभारण्यात आला होता. यात किल्ल्याच्या महाद्वाराची प्रतिकृती उभारण्यात आली होती. ही प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या सोहळ्याला भारतीय वाणिज्य दूत इंनबासेकर सुंदरामूर्ती आणि सहाय्यक वाणिज्य दूत सारासन यांनी उपस्थित राहून श्रींच्या आरती सोहळ्यात सहभाग नोंदवला, अशी माहिती सुमीत कुतवाल यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
सामूहिक अथर्वशीर्ष पठण, बालकलाकारांकडून गणेशस्तुती वंदना, अभंग कीर्तन सादरीकरण आणि भारतीय तसेच स्थानिक परदेशी बांधवांकडून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमांमुळे परिसर भक्तिमय झाला होता, तर पारंपरिक मराठी पोशाखांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. बार्सिलोना शहर आणि परिसरातील ४०० ते ५०० मराठी बांधवांसह भारतीय आणि परदेशी नागरिकांनीही उत्साहात सहभाग घेतला.