भाजप कार्यकर्त्यांचा समाजमाध्यमातून सवाल

ठाणे : भाजपच्या कोकण विभागीय ओबीसी जागर मोर्चा समारोप कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यातील एका अलिशान हॉटेलमध्ये करण्यात आले होते आणि या कार्यक्रमात मर्यादित कार्यकर्त्यांना बोलाविण्यात आले होते. यामुळे या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यास आल्याची भावना निर्माण होऊन अनेक कार्यकर्ते नाराज झाले असून यातूनच अलिशान हॉटेलऐवजी सर्वसाधारण ठिकाणी मैदनात हा कार्यक्रम घ्यायला हवा, असा सूर कार्यकर्ते लावत आहेत. तसे संदेशही समाजमाध्यमांवर दिवसभर फिरत होते. यामुळे कार्यक्रमाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाजपने मात्र हा संदेश चुकीचा असल्याचा दावा केला आहे.

राज्यात भाजप सरकारच्या काळात कोणत्या योजना सुरू करण्यात आल्या, ओबीसी समाज हितासाठी कोणते निर्णय घेण्यात आले आणि ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून सुरू असलेला प्रचार, याविषयी ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी भाजपने ओबीसी जागर मोर्चा आयोजित केला होता. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हा मोर्चा झाल्यानंतर कोकण विभागात घेण्यात आला. या मोर्चाचा समारोप कार्यक्रम ठाण्यातील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. सर्वसामान्य ओबीसी समाजासाठी हा कार्यक्रम होता. त्यामुळे हा कार्यक्रम अलिशान हॉटेलऐवजी सर्वसामान्य ठिकाणी घ्यायला हवा होता, असा सूर कार्यकर्ते लावत आहेत. तसे संदेशही समाजमाध्यमांवर दिवसभर फिरत होते. या संदर्भात भाजपचे ओबीसी ठाणे जिल्हाध्यक्ष सचिन केदारी यांच्याशी संपर्क साधला असता, हा संदेश चुकीचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. उनामुळे मैदानात हा कार्यक्रम करणे शक्य नव्हते. कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून केवळ पदाधिकाऱ्यांनाच निरोप देण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.

सरकार ओबीसीविरोधी; फडणवीस यांचा आरोप

 देशातील महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत ओबीसी आरक्षण कायम असून राज्यात ओबीसी आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे. सध्याचे सरकार हे ओबीसी विरोधी सरकार आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी ठाकरे सरकार आणि महाविकास आघाडी सरकार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.  करोनाकाळात बारा बलुतेदारांना सरकारने एका पैशांची मदत केली नाही, असेही त्यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्र्यांचे काम शरद पवार करतात’

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विरोधी बाकावर बसूनही महाराष्ट्रासाठी काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री असल्याची भावना वाटणे यात गैर काहीच नाही. सध्याच्या मुख्यमंत्र्याकडे कोणतेच काम नाही, त्यांचे काम हे शरद पवार करीत आहेत, असा टोला केंद्रीय पंचायतराजमंत्री कपिल पाटील यांनी लगावला.