डोंबिवली – लोकल टु ग्लोबल या पध्दतीने वावरणाऱ्या आताच्या तरूण पिढीला आपल्या मराठमोळ्या पारंपारिक जुन्या चालीरिती, परंपरा, आपली संस्कृतीची ओळख असावी, या दूरगामी विचारातून आषाढी एकादशीचे औचित्य साधून लेखिका, गायिका डाॅ. मेघा विश्वास यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘माय बोली साजिरी-मराठी मनाचा कॅन्व्हाॅस’ हा कार्यक्रम रविवारी सर्वेश सभागृहात साजरा करण्यात आला.
अडीत तास रंगलेल्या या कार्यक्रमात मराठमोळी संस्कृती, भाषा आणि तिचे विविध आयाम या कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका डाॅ. मेघा विश्वास आणि सहकाऱ्यांनी अभिवाचन, सांगीतिक पध्दतीने उलगडून दाखवले. इंग्रजीचा सर्वदूर बोलबाला असताना यामध्ये कुठे आपली मराठी हरवता कामा नये या दूरगामी विचारातून या कार्यक्रमाची संहिता डाॅ. मेघा यांनी तयार केली आहे. वारीला जाणारी प्रत्येक वारकरी शिकलेला असतोच असे नाही. तरीही तो आपल्या पध्दतीने पंढरपूरच्या वारीत सहभागी होऊन आपल्या वारकरी परंपरा, प्रथा, संस्कृतीचा प्रचार करत असतो. त्यामुळे आषाढी एकादशीचे औचित्य साधून डोंबिवलीत या कार्यक्रमाचे स्वयम एक्सप्लोर सेल्फतर्फे आयोजन करण्यात आले होते.
अडीच तास रंगलेल्या या कार्यक्रमात डाॅ. मेघा विश्वास, मानसी गर्गे, संजीव धुरी, समीर सुमन, वरूण देवरे, अंशुमान गद्रे, शशांक पडवळ यांनी मराठमोळ्या संस्कृतीमधील वाद्य, शस्त्र, अस्त्र, खाद्य, राहणीमान, पेहराव, अलंकार, हास्याची लकेर उमटवणारी आडनावे असे संस्कृतीचे अनेक पैलू उलगडून दाखविले. ढोलकीची धून, लोकगीतांवर रसिकांच्या माना डोलवल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्यकृतीचे मराठी संस्कृतीला लाभलेले देणे, पु. ल. देशपांडे, बा. भ. बोरकर आणि इतर नामवंत साहित्यांचे दाखले देत डाॅ. मेघा विश्वास यांच्या चमूने हास्याची लकेरी उडवत, कधी दाद मिळवत कार्यक्रम टिपेला नेला. कधी भावगीते तर कधी देशभक्तीपर गीते गाऊन कार्यक्रमात हळवेपणा आणला. अमेरिकेतील एका गायकाने चालबध्द केलेल्या जयोेस्तु ते श्रीमहन्मंगले या सावरकरांच्या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. मराठी संस्कृती, परंपरांची माहिती देणारे असे कार्यक्रम शाळा, महाविद्यालयांमध्ये झाले पाहिजेत, अशा प्रतिक्रिया उपस्थित रसिकांनी दिल्या.
आताच्या लोकल टु ग्लोबल वातावरणात आपली मराठी संस्कृती, भाषा, परंपरा याही टिकून राहिल्या पाहिजेत या दूरगामी विचारातून या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. हा कार्यक्रम शाळा, महाविद्यालयांमध्ये नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.- डाॅ. मेघा विश्वास, दिग्दर्शिका.