ठाणे : म्हाडा यापुढे बाहेरच्या संस्था किंवा कंत्राटदारांऐवजी स्वत:च परीक्षा घेईल, असे स्पष्ट करत राज्य शासनानेही स्वत:च परीक्षा घेण्याचे धोरण राबविणे गरजेचे आहे, असे मत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर रविवारी ठाण्यात व्यक्त केले.

पेपर फुटण्याच्या आधीच परीक्षा रद्द केली. पेपर फुटल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असता तर नक्कीच ते नामुष्कीचे ठरले असते. याशिवाय अभ्यास केलेल्या परीक्षार्थींवर अन्याय झाला असता, असे आव्हाड म्हणाले. पेपर फोडणारी टोळी उद्ध्वस्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि पोलीस एकाचवेळी कामाला लागले. त्यांनी वशिल्याची माणसे म्हाडामध्ये जाण्यापासून रोखली, असे त्यांनी सांगितले.

ज्या कंपनीला परीक्षेचे काम देण्यात आले होते, त्याच कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे. याच कंपनीने दोन आठवड्यांपूर्वी दोन लाख पोलिसांची परीक्षा घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास तरी कसा दाखवणार, असे आव्हाड म्हणाले. या प्रकरणी अटक केलेले दोन आरोपी आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात सामील असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे त्यांच्या हालचालींवर पोलीस पथके बारीक लक्ष ठेवून होती. या दरम्यान त्यांच्यात म्हाडाच्या पेपरबाबतही चर्चा होताच पोलिसांनी त्यांना अटक केली, अशी माहितीही त्यांनी दिली.

परीक्षा रद्द केल्याबद्दल विद्यार्थ्यांची माफी मागत असल्याचे आव्हाड यांनी नमूद केले. ही परीक्षा रद्द करण्यात आली असून वशिलेबाजीला फाटा देऊन हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षताही म्हाडा आणि पोलिसांनी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्याआधारे म्हाडा आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता, असेही त्यांनी सांगितले.

प्रश्नपत्रिका छपाईला गेल्यावर संबंधित कंपनीने त्या आपल्या ताब्यात ठेवू नयेत, असा नियम असतानाही या कंपनीच्या संचालकाने प्रश्नपत्रिका आपल्या लॅपटॉपमध्ये ठेवल्या होत्या. त्यामुळे गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परीक्षेत काही गैरप्रकार होणार असल्याचा संशय दोन दिवसांपूर्वीच आला होता. त्यामुळे गैरप्रकार आढळल्यास परीक्षा रद्द करण्याचा इशारा दिला होता. राज्यात पेपर फोडणारे दलाल हे एकाच टोळीतील आहेत. त्यामुळे अशा टोळ्या उद्ध्वस्त करण्याची गरज आव्हाड यांनी व्यक्त केली.