शहापूर : येथील आदिवासी पाड्यावरील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वालशेत शाळेमध्ये शिक्षक असून शाळेत घेऊन जातो, गणवेश, आधारकार्ड देतो अशी बतावणी करत अनोळखी व्यक्तीने तिला एका निर्जनस्थळी नेले होते. तिथे तिच्यावर अत्याचार केले.
पिडीत मुलीने एका दुकानातून आईला दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी शहापुर पोलीस ठाण्यात अनोळखी नराधमा विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. शहापूर तालुक्यातील वालशेत ग्रामपंचायत हद्दीतील एका पाड्यावर रस्त्यालगत असणाऱ्या घराजवळ एक अनोळखी दुचाकीस्वार आला. मी वालशेत शाळेत शिक्षक आहे, तुमच्या मुलीला शाळेत घेऊन जातो, गणवेश देतो, आधारकार्ड देतो तुम्हाला दोन हजार रुपये मिळतील अशी बतावणी पिडीत मुलीच्या आईला त्या व्यक्तीने केली.
मुलीच्या आईने विश्वास ठेवून मुलीला घेऊन जा व घरी आणून सोडा असे सांगितले. त्यानंतर दुचाकीस्वाराने १३ वर्षीय मुलीला पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांदळी येथे घेऊन गेला. एका निर्जनस्थळी घेऊन गेल्यावर तिच्यावर अत्याचार करून पोबारा केला. दरम्यान, मुलगी आली नाही म्हणून तिची शोधाशोध सुरू झाली होती. पीडित मुलीने एक दुकान गाठले तेथून फोनद्वारे संपर्क झाल्यानंतर मुलीच्या आईने शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांनी सांगितले. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील १३ वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.