एकाच प्रभागात विद्यमान नगरसेवकांची संख्या जास्त

नुकत्याच जाहीर झालेल्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रभाग रचनेचा सर्वाधिक फटका सत्ताधारी भाजपला बसला आहे. नव्या रचनेत एकाच प्रभागात विद्यमान नगरसेवकांची संख्या जास्त झाल्याने तसेच पक्षात बाहेरून आलेल्या इच्छुकांमुळे सर्वाचे समाधान करताना भाजप नेत्यांची तारांबळ उडणार आहे. यावर सर्वसमावेशक तोडगा न निघाल्यास भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता अधिक आहे.

सध्याची द्विसदस्यीय पद्धत बाद होऊन आता चार सदस्य प्रभाग पद्धत अस्तित्वात आली आहे. त्यात लोकसंख्यावाढीचे प्रमाणही सर्व भागांत समान नसल्याने अनेक ठिकाणी दोन किंवा तीन प्रभाग एकत्र करून आता एक प्रभाग करण्यात आला आहे. भाईंदर पूर्व भागातील खारीगावात तर चार प्रभागांचा मिळून एक प्रभाग करण्यात आला आहे. त्यामुळे एका प्रभागातील नगरसेवकांची संख्या चार असली तरी एकाच प्रभागात विद्यमान नगरसेवकांची संख्या त्याहून अधिक झाली आहे. नवी प्रभाग रचना अस्तित्वात येण्याआधी खारीगावात चार प्रभाग होते. त्यात भाजपच्या आणि बाहेरून पक्षात आलेल्या विद्यमान नगरसेवकांची अशी एकंदर संख्या आठ आहे. आता या ठिकाणी एकच प्रभाग झाल्याने केवळ चारच नगरसेवक निवडणूक लढवू शकणार आहेत. शिवाय निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी भाजपमध्ये अनेकांनी प्रवेश केला असल्याने त्यांनाही या ठिकाणी उमेदवारी मिळण्याची आशा आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांची निवड करणे तसेच उमेदवारी न मिळालेल्यांना इतरत्र सामावून घेणे ही नेत्यांसाठी मोठीच डोकेदुखी ठरणारी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्या प्रभागात काय परिस्थिती?

  • जेसल पार्क : भाजपचे वरिष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील, यशवंत कांगणे आणि मदन सिंह या तीन नगरसेवकांपैकी दोनच नगरसेवकांना पक्षाला उमेदवारी देणे शक्य होणार आहे.
  • भाईंदर पश्चिम : मोदी पटेल रस्ता ते क्रॉस गार्डन या प्रभागात भाजपच्या विद्यमान महापौर गीता जैन यांच्यासह तीन नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक धृवकिशोर पाटील  भाजपमध्ये सामील झाले आहेत; परंतु या प्रभागातील दोन जागा महिलांसाठी आणि एक जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव झाल्याने भाजपच्या डॉ. राजेंद्र जैन आणि डॉ. रमेश जैन या विद्यमान दोन नगरसेवकांपैकी एकालाच उमेदवारी मिळेल.
  • शांतीनगर (मीरा रोड) : या ठिकाणी चार सदस्यांच्या प्रभागात भाजपचे पाच विद्यमान नगरसेवक आहेत. त्यामुळे एका नगरसेवकाला स्थलांतर करावे लागणार आहे.
  • काशिमीरा : येथील जनतानगर भागातदेखील भाजपचे नगरसेवक अनिल भोसले आणि मीरादेवी यादव यांच्यापैकी एकाच नगरसेवकाला उमेदवारी मिळणार आहे. या प्रभागातील तीन जागा अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीयांसाठी राखीव झाल्याने एका नगरसेवकाला अन्यत्र आसरा शोधावा लागणार आहे.
  • नवघर : नवघर येथील दोन प्रभाग एकत्र झाले असून त्यात विद्यमान उपमहापौर प्रवीण पाटील आणि जयंती पाटील असे शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत. चार जागांपैकी तीन जागा अनुक्रमे अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय महिला आणि सर्वसाधारण महिला यांच्यासाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे दोघांपैकी एकालाच या ठिकाणी उमेदवारी मिळणार आहे.
  • उत्तन : उत्तनमध्ये तीन सदस्यांचा एक प्रभाग झाला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे बर्नड डिमेलो आणि लियाकत शेख नगरसेवक आहेत; परंतु तीन जागांपैकी दोन जागा महिलांसाठी राखीव असल्याने एका नगरसेवकाला उमेदवारीवर पाणी सोडावे लागणार आहे.