बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने आरोपीने पीडित महिलेवर ज्वलनशील रासायनिक द्रव्याने हल्ला केल्याची घटना काशी मिरामध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपीला गुजरातमधून अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाजारातून साहित्य घेऊन परतत असलेल्या महिलेला आरोपीने काशी-मिरा परिसरातील अदानी वीज कार्यालयासमोर गाठले. परिसरात शांतता असल्यामुळे मिरा रोड येथे राहणारा आरोपी आपल्या मित्रासह दुचाकी घेऊन आला होता. आरोपीने महिलेकडे त्याच्याविरोधात दाखल असलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेत असल्याचे स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावे अशी मागणी केली.

महिलेने लिहून देण्यास नकार दिला व ती पुढे चालू लागली. त्यावेळी एकाने तिच्या अंगावर हातातली ज्वालाग्रही द्रव्याने भरलेली बाटली फोडली. तिने आरडा ओरडा केल्याने ते दोघे हल्लेखोर हाटकेशच्या दिशेने पळून गेले. त्या बाटलीत पेट्रोल किंवा रॉकेल होते. ते तिच्या अंगावर पडले. त्यामुळे डोळ्याची खूपच जळजळ होऊ लागली. जमलेल्या लोकांनी तिला काशिमीरा पोलीस ठाण्यात नेले.

पोलिसांनी महिलेला उपचारासाठी भाईंदरच्या भिमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. तो ज्वलनशील पदार्थ पेट्रोल अथवा डिझेल असू शकतो, असे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनेला गांभीर्याने घेत तपासकार्य युद्धपातळीवर सुरु केले.

आरोपी मूळ गुजरातमधील अहमदाबाद येथील असल्याचे कळताच एक पथक त्या दिशेने पाठवले आणि त्याला तेथून सोमवारी पकडून आणले. मंगळवारी आरोपीला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास काशी मिरा पोलिस विभाग करत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mira road attack on women dmp
First published on: 05-02-2020 at 10:51 IST