लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : भिवंडीचे सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तात्काळ एमएमआरडीएने त्यांच्या गोदामांवर कारवाईचा निर्णय घेतला. कोणाला नोटीसा पाठविल्या जात आहेत. कोणाला तडीपार केले जात आहे. प्रशासनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी घेतला जात आहे. असे राज्यात पहिल्यांदा घडत आहे. अशा प्रकारामुळे लोकांच्या मनामध्ये सरकारबद्दल चीड निर्माण होत आहे अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर केली.

भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार बाळ्या मामा यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्यावेळी आव्हाड यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. भिवंडीत खाडी लगत भरणी सुरू आहे. त्यानंतर सरकारी यंत्रणांचा वापर करून गोदामे बांधली जात आहेत. खाडीत ठाणे महापालिकेचा कचरा टाकला जात आहे. हे पाप ‘गोदाम सम्राटा’चे आहे. गोदाम सम्राट केंद्रीय आहेत. त्यामुळे प्रशासन हालचाल करत नाही अशी टीका आव्हाड यांनी केली. महाराष्ट्राने सूडाचे राजकारण कधीही पाहिले नव्हते. आता ही निवडणूक लोक विरुद्ध सूड अशी आहे असेही आव्हाड म्हणाले.

आणखी वाचा-ठाणे, कल्याणात अशुद्ध पाणीपुरवठ्याची अफवा; पालिका प्रशासन म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका

बाळ्या मामा यांनी कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. कपिल पाटील हे निष्क्रिय खासदार आहेत. त्यांच्यावर जनता नाराज आहे. त्यांच्या घरासमोरील रस्ता त्यांना करता आला नाही. या रस्त्यावर अनेकांचे अपघात झाले आहेत. भिवंडीत वाहतुक कोंडीची समस्या आहे. इतक्या वर्षांत कपिल पाटील यांनी काय केले हा प्रश्न आहे असे बाळ्या मामा म्हणाले. कपिल पाटील हे सांगतात, माझा कोणताही व्यवसाय नाही. मग व्यवसाय नसताना त्यांच्याकडे इतका पैसा कुठून आला. भिवंडीत गुंडगिरी, चोरीच्या घटना वाढत आहेत. भिवंडीतील तरुणांना रोजगार नाहीत. अनेकजण अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. या मागे कोण आहे, हे शोधण्याची गरज आहे असा आरोपही बाळ्यामामा यांनी केला.

निलेश सांबरे यांना समजविण्याचा प्रयत्न

भिवंडी लोकसभेची निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना समजविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण आम्ही सर्व एका मतप्रवाहाचे आहोत. आम्ही एकाच विचारांच्या विरोधात आहोत. लवकरच यातून मार्ग निघेले असा दावा बाळ्या मामा यांनी केला.