डोंबिवली– महाराष्ट्रात राज्य रस्ते, महामार्ग आहेत. पण कल्याण-शिळफाटा रस्त्या सारखा खड्डे, वाहतूक कोंडी सारखे प्रकार या रस्त्यांवर फार कोठे दिसत नाहीत. राज्यातील ‘ट्राफिकची राजधानी’ हा किताब कल्याण शिळफाटा रस्त्याने पटकावला आहे म्हणून हा रस्ता दररोज कोंडीत अडकून प्रवाशांचे हाल केले जात आहेत का? निकृष्ट दर्जाचे बांधणी काम करुन या रस्त्याची वाताहत केली जात आहे का? असे उव्दिग्न प्रश्न कल्याण ग्रामीणचे आ. प्रमोद पाटील यांनी शिळफाटा रस्ता पाहणी दौरा दरम्यान गुरुवारी अधिकाऱ्यांना केले.

पलावा चौकात तात्पुरते डांबरीकरणाचे काम करुन हा रस्ता वाहनांसाठी सुरळीत राहील याची काळजी घ्या आणि येत्या आठवड्याभरात या भागातील वाहन कोंडी बंद करा, असे आदेश आ. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

शिळफाटा रस्त्यावरचे खड्डे, वाहतूक कोंडी, प्रवाशांचे होणारे हाल, निकृष्ट आणि कोणतेही नियोजन न करता सुरू असलेल्या रस्ते कामाची बांधणी या अनुषंगाने आ. प्रमोद पाटील यांनी शिळफाटा रस्त्याचा गुरुवारी पाहणी दौरा केला. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, कोळसेवाडी, डायघर वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कल्याण-शिळफाटा या २१ किमी लांबीच्या भिवंडी बाह्यवळण रस्ता-कल्याण दुर्गाडी-शि‌वाजी चौक-पत्रीपूल -काटई ते शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण, काँक्रीटीकरणाचे काम एमएसआरडीसीकडून सुरू आहे. यामधील ८० टक्क्याहून अधिक काम पूर्ण झाल्याचा दावा एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांच्याकडून करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून काटई नाका, पलावा चौक, मानपाडा, देसई, खिडकाळी भागात दररोज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी होऊन नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि इतर सामान्य प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. स्वता आमदार, कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण काटई-पलावा भागात राहत असल्याने त्यांनाही या कोंडीचा फटका बसत आहे.

या पार्श्वभूमीवर आ. प्रमोद पाटील यांनी गुरुवारी एमएसआरडीसीचे वरिष्ठ अभियंते, वाहतूक विभागाचे अधिकारी, ठेकेदार कंपनीचे अधिकारी, ठेकेदार यांना शिळफाटा काटई, पलावा चौकात बोलावून सुरू असलेल्या कामा विषयी आणि ढिसाळ नियोजना विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दर्जा उत्तम ठेवा

शिळफाटा रस्ते कामासाठी अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत आहे. या कामावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ठेकेदार मनमानीने काम करत आहे. त्यामुळे बांधणी केलेला रस्त्याच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे आ. पाटील यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. रस्ते कामाची बांधणी करताना या रस्त्यावरील वाहतुकीचा विचार करुन नियोजन करुन मग कामे करा. असा कोणताही विचार ठेकेदार कंपनी करत नाही. त्याचा फटका प्रवाशांना बसतोच, पण सततच्या वाहन वर्दळीमुळे हाती घेतलेले कामही वेळेवर पूर्ण होत नाही, असे आ. पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.

पलावा चौक रस्ता

पलावा चौकात एम ६० (युटीडब्ल्युटी-अल्ट्रा थीन वेअरिंग ट्रिटमेंट) उच्चतम दर्जाचे काँक्रीटीकरण (हाय स्ट्रेन्थ काँक्रीट) करुन वाहतुकीत अडथळा आणून प्रवाशांचे हाल करण्यापेक्षा पलावा चौकात या चौकातील उड्डाण पूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत या चौकात नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळेत डांबरीकरण करुन या रस्त्यावरील कायमस्वरुपी सुरू राहील अशी व्यवस्था करा. एम ६० तंत्रज्ञानाने आताच पलावा चौकातील रस्ते काम सुरू केले तर यासाठी १० दिवस जातील. या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांचे अतोनात हाल होतील. त्यापेक्षा पूलाचे काम पूर्ण होईपर्यंत, या भागातील उर्वरित रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत पलावा चौकातील रस्ता तात्पुरता साध्या डांबरीकरणाने पूर्ण करा, अशी सूचना आ. पाटील यांनी अधिकारी, ठेकेदार यांना केली.

प्रसंगी मल बंद ठेऊ

काटई, पलावा, खिडकाळी, देसई, मानपाडा भागातील रस्त्याची राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रसंगी या भागातील वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी शिळफाटा रस्त्या लगतचे मॉल एक-दोन दिवस बंद ठेवण्यासाठी मॉल मालक, येथील व्यावसायिकांना आपण विनंती करू. त्यांचे या कामासाठी सहकार्य घेऊन ही कामे उत्तम दर्जाची पध्दतीने पूर्ण करू अशीही चर्चा या भेटीच्या वेळी झाली. कोणत्याही परिस्थितीत घाई गर्दीत निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरुन कामे पूर्ण करू नका, असा इशारा यावेळी आ. पाटील यांनी ठेकेदार, अधिकाऱ्यांना दिला.

एम ६०, युटीडब्ब्युटी म्हणजे

रस्ते, चौकाखाली जल, मल, दूरसंचार, महावितरणच्या सेवा वाहिन्या असतात. त्यांना धक्का न लावता त्या भागातील काम झटपट पूर्ण होण्यासाठी कमी जाडीचा थर टाकून (युटीडब्ल्युटी) उच्चतम प्रतीचे काँक्रीट (एम६०) त्या रस्ते, चौका भागात टाकून तो रस्ता अर्धा ते एक तासात वाहनांसाठी सुरू केला जातो. टाकलेले काँक्रीट अर्धा तासात सुकते.

आठ दिवसात कोंडीमुक्त

काटई-पलावा चौक भागातील सुरू असलेली कामे आठ दिवसात पूर्ण करून शिळफाटा रस्ता कोंडी मुक्त करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी आमदारांना दिले आहे.

शिळफाटा रस्त्यावरील वाढती वाहन कोंडी विचारात घेऊन पलावा चौकात तात्पुरत्या स्वरुपात डांबरीकरण करुन या भागातील पूल, रखडलेली कामे पूर्ण झाली की उच्चतम दर्जाचे काँक्रीट वापरुन पलावा चौकातील रस्ते काम पूर्ण करावा. रस्ते कामासाठी गुणवत्तापूर्ण बांधकाम साहित्य वापरण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

प्रमोद पाटील आमदारकल्याण ग्रामीण