ठाणे : ठाणे महापालिकेच्या नोकरभरतीत इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणाऱ्या शिबिराचे आयोजन महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेने द युनिक अकॅडमीच्या माध्यमातून केले होते. या शिबिरात मार्गदर्शन करताना भाजपचे आमदार संजय केळकर ठाणे महापालिका भरतीकरिता उमेदवारांना महत्वाचा कानमंत्र दिला. तसेच त्यांनी ठाणे महापालिकेच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
ठाणे महापालिकेच्या नोकरभरतीत इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणाऱ्या शिबिराचे आयोजन महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेने द युनिक अकॅडमीच्या माध्यमातून केले होते. भाजपचे आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. ठाण्याच्या नुरीबाबा दर्गा रोड येथील अनुराधा मंगल कार्यालय येथे आयोजित शिबिरात चारशेहून अधिक महापालिकेतील कंत्राटी कर्मचारी आणि बेरोजगार तरुण-तरुणी उमेदवार उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्ता घुगे, सरचिटणीस अजित मोरे, कोषाध्यक्ष सुधाकर शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या शिबिरामुळे भरतीसाठी तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांना योग्य दिशा मिळाली असून, संघटनेचा हा उपक्रम उपयुक्त आणि आत्मविश्वास निर्माण करणारा ठरला आहे, अशा प्रतिक्रिया सहभागी उमेदवारांनी दिल्या.
विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन
द युनिक अकॅडमी’च्या तज्ज्ञ शिक्षकांनी भरती प्रक्रियेचे स्वरूप, परीक्षेचा अभ्यासक्रम, गणितापासून सामान्य ज्ञानापर्यंत विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच, मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप याबद्दल माहिती दिली. शिबिरादरम्यान, उमेदवारांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उमेदवारांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
मार्गदर्शन आणि प्रशिक्षण फायदेशीर ठरेल
आमदार ॲड.निरंजन डावखरे यांनी देखील उमेदवारांना यथोचित मार्गदर्शन केले. युनिक अकॅडमी ही स्पर्धा परीक्षांसाठी उमेदवारांना प्रशिक्षण देत आहे. महापालिका भरतीत कंत्राटी कर्मचारी किंवा इतर बेरोजगार तरुण उमेदवारांचा गोंधळ उडू नये, यासाठी या संस्थेचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण फायदेशीर ठरेल, असे मत व्यक्त करत त्यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष महेश कदम यांनी देखील कामगारांच्या न्याय हक्काच्या लढ्यात आम्हाला नेहमी यश मिळाल्याचे सांगून कंत्राटी कामगार आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी उमेदवारांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत, असा विश्वास दिला.
आमदार संजय केळकर यांचा उमेदवारांना कानमंत्र
आम्ही केवळ कामगारांच्या मागण्या पुढे रेटून त्या मिळवत नाही तर नोकरभरतीत उमेदवारांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना यशाचा मार्गही दाखवतो. आम्ही दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेतो. त्यात नियमित अभ्यास केला, सराव परीक्षा, मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला, त्यामुळे यश मिळाले, असा शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा अनुभव असतो. द युनिक अकॅडमी ही संस्था अर्थातच ‘युनिक’ प्रशिक्षण देणार आहे. शिबिराचा लाभ घेऊन नियमित अभ्यास करा, म्हणजे यश तुम्हाला नक्कीच मिळेल, ठाणे महापालिकेत कायम स्वरुपी सेवा करण्याची संधी मिळेल, असा कानमंत्र देत आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.