कल्याण : कल्याण शहरातील मेट्रोच्या जुन्या मार्गात बदल करून दुर्गाडी चौक, आधारवाडी चौक, खडकपाडा ते बिर्ला महाविद्यालय सुभाष चौकमार्गे कल्याण रेल्वे स्थानक या नव्या मेट्रो मार्गाला एमएमआरडीएच्या बैठकीत नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती शिंदे शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख व एमसीएचआयचे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी माध्यमांना दिली.
ठाणे, भिवंडीकडून येणारा मेट्रो पाच मार्ग कल्याण शहरातून दुर्गाडी किल्ला, लालचौकी, सहजानंद चौक, शिवाजी चौक ते पत्रीपूल बाजार समिती असा प्रस्तावित होता. कल्याण शहराचे नागरीकरण झाल्याने नवीन कल्याण पश्चिमेत विकसित झाले आहे. या विस्तारित नागरीकरणाचा विचार करून मेट्रो मार्ग शिवाजी चौक मार्गे न नेता ही मेट्रो दुर्गाडी चौक, आधारवाडी, खडकपाडा, बिर्ला महाविद्यालय, सुभाष चौकमार्गे कल्याण रेल्वे स्थानक भागात देण्याची मागणी शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील मागील पाच वर्षापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, एमएमआरडीएकडे करत होते.
मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी कल्याणमधील विकासकांच्या एका कार्यक्रमात हा बदल केला जाईल, असे आश्वासन दिले होते. खासदार डाॅ. शिंदे या मार्ग बदलासाठी प्रयत्नशील होते. गेल्या आठवड्यात खासदार डाॅ. शिंदे यांची मुंबईत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांच्या बरोबर बैठक झाली. यावेळी कल्याणमधील मेट्रो पाचचा विषय चर्चेला आला. यावेळी कल्याण शहरातून शिवाजी चौक मार्गे मेट्रो मार्ग नेला तर येणाऱ्या अडचणींची माहिती त्यांना देण्यात आली. दुर्गाडी किल्ला चौक ते खडकपाडा मार्गाने मेट्रो नेली तर शहरवासियांना त्याचा कसा लाभ होईल, हे महानगर आयुक्तांना पटवून देण्यात आले.
या चर्चेनंतर कल्याणमधील नवीन मेट्रो मार्गाच्या नवीन विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. कल्याणमधील हाच मेट्रो मार्ग सुभाष चौकातून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमधील चिखलोली परिसरातून येत्या काळात धावणाऱ्या मेट्रो मार्गाला जोडणे शक्य होणार आहे, अशी माहिती रवी पाटील यांनी दिली.
या बैठकीत टिटवाळा, कल्याण ते डोंबिवली बाह्य वळण रस्ता, नवीन गांधारी उड्डाण पूल, कल्याण ते पडघा चार पदरी मार्ग, कल्याण शिळफाटा रस्त्यावरील उड्डाण पूल विषयावर चर्चा करण्यात आली. २०२८ मध्ये कल्याणमधील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील मेट्रो मार्गांचे भूमिपूजन करण्यात आले होते.