दुर्गाडी किल्ल्याजवळील पुलास ‘एमएमआरडीए’ची मंजुरी; ठाणे-डोंबिवली प्रवास जलद होणार
वर्षांनुवर्षे केवळ चर्चेच्या गुऱ्हाळात सापडलेल्या डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर ते माणकोली या खाडी पुलावर उड्डाणपूल उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने अखेर मंजुरी दिली असून येत्या फेब्रुवारी महिन्यात या कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन श्रत्रीय यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत पुलाच्या उभारणीची सुमारे २२० कोटी रुपयांची निविदा नुकतीच मंजूर करण्यात आली. तब्बल सात वर्षांपूर्वी यासंबंधीचा मूळ प्रस्ताव मंजूर झाला होता. दरम्यान, या पुलाच्या उभारणीमुळे ठाणे ते डोंबिवली हा प्रवास अधिक वेगवान होणार असून तब्बल ३५ ते ४० मिनिटात हे अंतर कापत येणार आहे. विशेष म्हणजे, डोंबिवलीकरांना मुंबई, ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी वेगवान प्रवासाचा पर्यायी मार्ग यामुळे उपलब्ध होणार आहे.
सद्य:स्थितीत डोंबिवलीकरांना ठाणे, मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी कल्याण-शीळ-महापे या मार्गाचा वापर करावा लागतो. शीळफाटा चौकात आल्यावर मुंब्रा वळण रस्त्यावरून कळवा-ठाण्यात येण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे हा प्रवास अनेकांना नकोसा होता. डोंबिवली-ठाणे-मुंबई हे अंतर अधिक जवळ यावे आणि डोंबिवलीकरांना पर्याय मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी तब्बल आठ वर्षांपूर्वी माणकोली खाडीपुलाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात या प्रस्तावास अंतिम मान्यता देण्यात आली. मात्र, या कामाची निविदा प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याने पूल बारगाळणार की काय, अशी चिन्हे निर्माण झाली होती.
दरम्यान, गेल्या वर्षभरात या कामाची निविदा वेगाने उरकण्यात आली. यासंबंधीचा निविदा प्रस्ताव ऑक्टोबर महिन्यात मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीपुढे मांडण्यात आला होता. मात्र, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने तो मागे ठेवण्यात आला. अखेर तब्बल तीन महिन्यांनी यासंबंधीचा प्रस्ताव पुन्हा कार्यकारी समितीपुढे येताच त्यास मान्यता देण्यात आली, अशी माहिती महानगर विकास प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. माणकोली उड्डाणपूल तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुर्गाडीजवळ नवीन उड्डाणपूल
कल्याण-भिवंडी, शिळफाटा रस्त्यावरील वाढती वाहतूक विचारात घेऊन, येणाऱ्या काळात दुर्गाडीजवळील सध्याचा एक उड्डाणपूल वाहतुकीसाठी अपुरा पडेल, हा विचार करून ‘एमएमआरडीए’ने कल्याण खाडीवर ३८० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा पूल सहा पदरी, (दोन्ही बाजूला तीन रांगा) २५ मीटर रुंदीचा आहे. दुर्गाडी पुलासाठी प्राधिकरणाने सुमारे ७६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
माणकोली, दुर्गाडी उड्डाणपुलांची कामे सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया आणि जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर या दोन बांधकाम कंपन्या करणार आहेत.
रायगड, कोकण, दक्षिणेत जाणारी मालवाहू वाहने मधला मार्ग म्हणून कल्याण शहरातून पुढचा प्रवास करतात. दक्षिणेकडून येणारी गुजरात, नाशिक, उत्तरेकडे जाणारी वाहने शीळफाटा, कल्याणच्या दिशेने इच्छित स्थळी निघून जातात. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ठाणे परिसरातून येणाऱ्या वाहनांमुळे दररोज दुर्गाडीजवळ वाहतूक कोंडी होत असते.

माणकोली पूल
रेतीबंदर खाडीवर (गणेशघाट) माणकोली गावाच्या दिशेने ३ किलोमीटर लांबीचा (१२६६ मीटर) उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.
या पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पुलाच्या उभारणीसाठी २२३ कोटी खर्च येणार आहे.
या पुलामुळे कल्याणमधील शिवाजी चौक, शीळफाटा, भिवंडी वळण रस्त्यावर येणारा वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
माणकोली उड्डाण पुलासाठी मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटक ते खाडी किनाऱ्यापर्यंत ३२५ मीटर लांब व ४५ मीटर रुंदीचा पोहच रस्ता बांधण्यात येणार आहे.
१९९७ मध्ये पालिकेने रेल्वे फाटक ते खाडी किनाऱ्यापर्यंत २२५ मीटरचा रस्ता बांधला आहे. हा रस्ता १५ मीटर रुंदीचा आहे.
माणकोलीच्या दिशेने माणकोली ते मुंबई नाशिक महामार्गापर्यंत तीन किमीचा पोहच रस्ता बांधण्यात येणार आहे.
माणकोली पूल सहा पदरी (दोन्ही बाजूला तीन रांगा) असणार आहे.

‘एमएमआरडीए’च्या कार्यकारी परिषदेने दुर्गाडी, माणकोली उड्डाण पुलांच्या कामास मंजुरी दिली आहे. समितीचे इतिवृत्त आणि स्वीकारपत्र आले की, तातडीने दोन्ही बांधकाम कंपन्यांना कामाचे आदेश देण्यात येतील. पुढील महिन्यापर्यंत ही कामे सुरू केली जातील.
– चिवणे, कार्यकारी अभियंता ‘एमएमआरडीए’

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda aproved flyover project on creek bridge
First published on: 20-01-2016 at 01:58 IST