ठाणे : घोडबंदर मार्गावरील कासारवडवली, ओवळा, गायमुख येथील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी भाईंदरपाडा येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उड्डाणपूल उभारला आहे. या उड्डाणपूलाच्या निर्माणामुळे या भागातील वाहतुक कोंडीमध्ये ६० टक्क्यांनी घट झाल्याचा दावा येथील वाहतुक पोलिसांनी केला. तसेच उड्डाणपूलाखालील मार्गिकेवरही घट झाली आहे. या भागात विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीवरही आळा बसला आहे.
घोडबंदर मार्गावरून उरण जेएनपीटी येथून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या आणि वसई, गुजरात येथून उरण जेएनपीटी भिवंडीच्या दिशेने येणाऱ्या हजारो अवजड वाहनांची वाहतुक होते. तसेच परिवहन सेवेच्या बसगाड्यांची, हलक्या वाहनांची देखील वाहतुक होत असते. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दुपारी १२ ते सायंकाळी ४ आणि रात्री ११ ते पहाटे पाच यावेळेत परवानगी आहे. त्यामुळे अवजड वाहनांना प्रवेशबंदीच्या वेळेत गायमुख चौपाटी परिसरात रोखले जाते. त्यातच घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहेत. या कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. तसेच घोडबंदरची मुख्य मार्गिका सेवा रस्त्यांमध्ये सामाविष्ट करण्याचे काम देखील सुरु आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावर नेहमी वाहतुक कोंडी होत आहे.
नागलाबंदर परिसर, कासारवडवली, भाईंदरपाडा भागातील मुख्य रस्त्यांची स्थिती चांगली नाही. त्यामुळे कोंडीत भर पडते. दरम्यान, येथील भाईंदरपाडा येथील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उड्डाणपूल उभारला आहे. या उड्डाणपूलाचे लोकार्पण बुधवारी झाले. पहिल्याच दिवशी येथील वाहतुक कोंडीत घट झाल्याची माहिती येथील वाहतुक पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली.
उड्डाणपूल सुरु होण्यापूर्वी घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी नागलाबंदर ते गायमुख चौपाटी पर्यंत दररोज वाहतुक कोंडीचा त्रास होत होता. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी अशीच परिस्थिती होते. परंतु भाईंदरपाडा उड्डाणपूल सुरु झाल्याने येथील वाहतुक कोंडीत ६० टक्क्यांनी घट झाली. तसेच येथील भुयारी मार्गिकांमुळे विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीस लगाम बसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.