बदलापूरः वाढत्या बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपूल अपुरा पडत असल्याने शहरात दुसरा उड्डाणपूल उभारण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्या उड्डाणपुलावर सध्या मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असली तरी नव्या उड्डाणपुलासाठी किमान तीन वर्षे लागणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी दुसऱ्यांदा निविदा जाहीर करण्यात आली आहे. सर्व प्रक्रिया वेळेत पार पडल्यास कार्यादेश दिल्यानंतर उड्डाणपुलाची उभारणी करण्यासाठी ३६ महिन्यांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे बदलापुरकरांना नव्या उड्डाणपुलासाठी किमान २०२८ ची वाट पाहावी लागणार आहे.
बदलापूर शहरात पूर्व पश्चिम प्रवास करण्यासाठी सध्याच्या घडीला एकच उड्डाणपूल आहे. त्यामुळे बदलापूर शहराच्या कोणत्याही टोकाला असलेल्या वाहनचालकाला स्थानकाशेजारी असलेल्या मध्यवर्ती भागातील उड्डाणपुलाजवळ यावे लागते. तेथून पूर्व पश्चिम प्रवास करणे सोपे होते आहे. मात्र या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असते. त्यात उड्डाणपुलही अरूंद असल्याने उड्डाणपुलावरही वाहने संथगतीने चालतात. त्यामुळे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या सर्वच मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पूर्व पश्चिम वाहतुकीसाठी दुचाकी आणि रिक्षांसाठी उड्डाणपुलाखाली आणि बेलवली येथे अरूंद भुयारी मार्ग आहे. मात्र जोरदार पाऊस पडल्यास त्यात पाणी साचते आणि मार्ग बंद होतो. याचा फटका शहरातील शालेय विद्यार्थी, प्रवाशांना बसतो. त्यामुळे बेलवली येथे बदलापूर शहराच्या प्रवेशद्वारावर आणि कार्मेल शाळेपर्यंत नव्या उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली होती.
त्यासाठीची निविदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काढण्यात आली होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये निघालेल्या या निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे एमएमआरडीएने यासाठीची निविदा नव्याने काढली. आता नऊ महिन्यांनंतर ही निविदा जाहीर करण्यात आली आहे. मात्र या निविदेलाही प्रतिसाद मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. विशेष म्हणजे निविदाकार मिळाल्यानंतरही कार्यादेश देऊन काम पूर्ण होण्यासाठी ३६ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. बांधकामांचा इतिहास पाहता त्यात आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदलापुरकरांना आणखी तीन वर्षे एकमेव उड्डाणपुलावरूनच प्रासा करावा लागणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. नव्या उड्डाणपुलासाठी २०२८ उजाडण्याची शक्यता आहे.
असा आहे उड्डाणपूल
पूर्व पश्चिम जोडण्यासाठी बदलापुरातील दुसरा पूल बेलवली येथे लोटस तलावापासून सुरू होणार आहे. तो पूर्वेला कार्मेल शाळेजवळ उतरेल. दोन्ही बाजूंना दोन दोन मार्गिका चढण्या आणि उतरण्यासाठी असणार आहेत. उड्डाणपुलाची एकूण लांबी ७८० मीटर इतका असून तो १२ मीटर रूंद असणार आहे. बदलापूर शहरातील पूर्व पश्चिम प्रवासासाठी हा उड्डाणपूल महत्वाचा ठरणार आहे.