ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी टोलप्रश्नावरून बेमुदत उपोषण सुरू केलं. यानंतर उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन अविनाश जाधव यांची भेट घेतली. तसेच त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं. यानंतर अविनाश जाधव यांनी उपोषण मागे घेतलं. यावर बोलताना राज ठाकरेंनी उपोषण करणं हे आपलं काम नाही, असं मत व्यक्त केलं. ते रविवारी (८ ऑक्टोबर) ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “मी अविनाश जाधव यांना फोन केला आणि सांगितलं की, असले उपोषण करणं हे आपलं काम नाही. मी उद्या सकाळी येतो. गेल्या अनेक वर्षे टोलसंदर्भात मनसेने अनेक आंदोलनं केली. महाराष्ट्रातील अधिकृत आणि अनधिकृत असे जवळपास ६५-६७ टोलनाके आम्ही बंद केले. त्याचवेळी भाजपा-शिवसेनेचा जाहीरनामा आला होता. त्यात त्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू असं आश्वासन दिलं होतं.”
“टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं”
“टोलमुक्त महाराष्ट्र करू हे त्यांनी २०१४ लाही सांगितलं होतं आणि २०१७ लाही सांगितलं होतं. परंतु पत्रकारांकडे वेळ नसल्याने त्यांनी यांना टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं हे कधी विचारलं नाही. प्रत्येकवेळी कुठेही गेलं की मला प्रश्न विचारला जातो की, टोलच्या आंदोलनाचं काय झालं. मात्र, त्याचे परिणाम अनेकांना दिसत नाहीत,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
“विरोधात मतदान झालंच नाही तर त्यांना समजणार कसं?”
राज ठाकरे पुढे म्हणाले, “मला जनतेचे आश्चर्य वाटतं की निवडणुकीच्या काळात थापे मारतात, तुम्हाला पिळ पिळ पिळटतात आणि तुम्हाला त्यांनाच मतदान करायचं आहे. जी लोकं तुमच्याशी खोटं बोलत आहेत, त्यांना कधी कळलंच नाही आपण ज्या गोष्टी करतोय त्या चुकीच्या आहेत, विरोधात मतदान झालंच नाही तर त्यांना समजणार कसं? त्यामुळे दरवेळेला या गोष्टी होतात.”
हेही वाचा : “एकनाथ शिंदेंना मला प्रश्न विचारायचा आहे की…”, टोल दरवाढीसंदर्भात राज ठाकरे संतापले
अविनाश जाधवांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं
“मी अविनाथ जाधव यांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं आहे. या लोकांसाठी जीव गमावू नकोस, असं सांगितलंय. कारण एक जीव गेल्याने त्यांना काहीही फरक पडत नाही. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून चर्चा करणार आहे”, असंही ते म्हणाले.