Kalyan Hospital Receptionist Kicked: कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी-अमराठी वाद पेटण्याची शक्यता आहे. कल्याण पूर्वेतील नांदिवली गावातील श्री बाल चिकित्सालय रुग्णालयातील रिसेप्शनिस्टला सोमवारी सायंकाळी एका अमराठी तरूणाकडून बेदम मारहाण करण्यात आली. क्षुल्लक कारणावरून संबंधित आरोपी तरूणाने अक्षरशः लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर आता या विषयावरून राजकारण पेटले आहे. संबंधित आरोपी अद्याप फरार असून त्याच्या अटकेची मागणी होत आहे. दरम्यान मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरूणीची भेट घेऊन तिला धीर दिला आहे. तसेच वैद्यकीय उपचारांसाठी मनसेकडून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज पीडित तरुणीची भेट घेतली. यावेळी त्यांनी तरूणीला रुग्णालयात दाखल होत उपचार घेण्याचा सल्ला दिला. तसेच उपचाराचा खर्च मनसेकडून उचलला जाईल, असे आश्वासन दिले. “पोलीस आरोपीच्या मागावर आहेत. त्यांना तो सापडला तर ठीक आहे. तो आमच्या हाताला लागला तर तुझा बदला आम्ही घेऊ”, असे अविनाश जाधव म्हणाले.
त्या हातांचा आम्ही बंदोबस्त करू
पीडितेने तिच्याबरोबर घडलेला प्रसंग यावेळी कथन केला. माझे आई-वडील हयात नाहीत. आरोपीने मला आईवरून अश्लील शिवीगाळ केली. तसेच माझ्या छातीवर, मानेवर लाथा-बुक्क्या घालून मारहाण केली आणि माझ्या केसाला पकडून बाहेर फरफटत नेण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पीडितेने दिली. यावर अविनाश जाधव म्हणाले की, ज्या हातांनी तुला मारलं, त्या हातांचा आम्ही बंदोबस्त करू.
पीडितेच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधत असताना अविनाश जाधव म्हणाले, “आरोपी ज्यापद्धतीने मारहाण करत आहे, त्यावरून तो गुन्हेगार असल्याचे दिसते. आरोपीला मनसे धडा शिकवणार, हे नक्की. यावरून एक दिसते की, जेव्हा जेव्हा मराठीच्या मुद्द्यावरून मारहाण होते, तेव्हा उत्तर भारतातील लोक आरडाओरडा करतात. पण आम्ही आजवर कुठल्याही महिलेवर हात उगारला नव्हता. आम्ही पीडित तरूणीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार.”