ठाणे जिल्ह्यातून बुलेट ट्रेन प्रकल्प जात असून त्यासाठीच्या जमीन हस्तांतरणाचे जिल्हा प्रशासनातर्फे काम सुरु आहे. यातील बाधितांचे जिल्हा पुनर्वसन विभागातर्फे पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र या जमीन हस्तांतरण आणि मोबदला प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कल्याण ग्रामीण मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी केला आहे. यात स्थानिक नागरिकांना घरांच्या मोबदल्यात सहा लाख रुपये देण्यात आले आहे, तर परप्रांतीयांना १४ लाख रुपये दिले असल्याचा आरोप प्रमोद पाटील यांनी केला आहे. याबाबत शुक्रवारी पाटील यांनी काही बाधितांसह ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेतली.

हेही वाचा >>>कल्याण : राज्य-जिल्हा यंत्रणेत एकमत नसल्याने आदिवासी विकासाची ठक्कर बाप्पा योजना ठप्प

ठाणे जिल्ह्यातून बुलेट ट्रेन जात असून त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादन पूर्ण झाले आहे. तर प्रकल्पासाठी लागणाऱ्या आणि संपादित केलेल्या जमिनीचा ताबा जिल्हा प्रशासनाकडून नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला देण्यात आला आहे. यातील बाधितांचे विशेष मालवाहतूक रेल्वे मार्गिका प्रकल्पातील बाधितांप्रमाणेच पुनर्वसन करण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक बाधित कुटुंबाला १४ लाख रुपये मोबदला देण्यात येत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग हा कल्याण तालुक्यातील शीळ – डायघर भागातून देखील जात आहे. मात्र येथील बाधितांना मोबदला देण्याच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार प्रमोद पाटील यांनी केला आहे. मोबदला देते वेळी गुरचरणाच्या जागी बांधकाम दाखविण्यात आले आहेत. तसेच ज्यांची हक्काची जागा आहे अशा स्थानिक बाधितांना मोबदल्याचे सहा लाख रुपये देण्यात आले आहे. तर परप्रांतीयांना त्यांच्या कच्या बांधकामाचे १४ लाख रुपये देण्यात आले असून या प्रकियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी पाटील यांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. तर बाधितांना योग्य तो मोबदला देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. आमदार प्रमोद पाटील यांनी भेट घेतली असून बुलेट ट्रेन प्रकल्पातील बाधितांना असलेल्या काही समस्यां त्यांनी मांडल्या. आमदार पाटील यांनी सांगितलेल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना तपासाचे आदेश देण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

हेही वाचा >>>शहापूर : अल्पावधीत प्रसिद्धी मिळालेल्या गायकाचा विजेच्या झटक्याने मृत्यू

दिवा तसेच शीळ डायघर येथून बुलेट ट्रेनचा मार्ग जात आहे. दिवा येथील जागेवरील परप्रांतीय बाधितांच्या ताडपत्रीने बांधलेल्या घरांना १४ लाख रुपये मोबदला देण्यात आला आहे. तर शीळ डायघर येथील स्थानिक नागरिकांचे स्वतःचे पक्के आणि जुने बांधकाम असून देखील केवळ सहा लाख रुपये मोबदला देण्यात आला आहे. बाधितांना योग्य मोबदला देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.- प्रमोद पाटील, आमदार, मनसे, कल्याण ग्रामीण विधानसभा