ठाणे : मराठी भाषेबद्दल अपशब्द काढत आहेत तसेच मराठी भाषा बोलणार नाही असे म्हणत आहेत, त्यांचा किडा मनसेने शांत केला आहे. तरी देखील अजूनही ज्यांच्यामध्ये किडा वळवळत आहे. त्यांनी केडियाचे जे काही झाले ते पाहावे असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला. मनसे आणि शिवसेना ठाकरेच्या नादाला लागू नका, नाहीतर अशाच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असे सुचक इशारा देखील त्यांनी दिला.
मुंबईतील व्यावसायिक सुशील केडिया यांनी समाजमाध्यमांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून एक वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यात त्यांनी मराठी येत नसल्याचे सांगत, मराठी शिकणार नाही असे वक्तव्य केले होते. एवढेच नाही तर त्यांनी राज ठाकरे व एका दहशतवादीच्या धोरणात काय फरक आहे? असा थेट सवालही उपस्थित केला होता. त्यामुळे सुशील केडिया यांच्या विरोधात मनसेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर अखेर सुशील केडिया यांनी समाजमाध्यमांवरून माफी मागितली.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अविनाश जाधव म्हणाले, काही उद्योगपती हे मराठी भाषेबद्दल अपशब्द काढत आहेत मराठी भाषा बोलणार नाही असे म्हणत आहेत, त्यांचा किडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शांत केला आहे. तरीदेखील ज्यांच्यामध्ये अजूनही किडा वळवळतोय, त्यांनी केडियाचे जे काही झाले ते पाहावे. यापुढे मनसेच्या आणि शिवसेना ठाकरेच्या नादाला लागू नका. आमच्या नादाला लागलात तर अशाच प्रकारे उत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशारा जाधव यांनी दिला.
काही ठराविक लोक प्रसिद्धीसाठी असले प्रकार करतात, मात्र त्यांची ती प्रसिद्धी आम्ही उतरवणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, मीरा-भाईंदर प्रकरणावर अनेक राजकर्त्यांच्या प्रतिक्रिया उमटत असताना, आज राज ठाकरे यांच्या स्पष्ट भूमिकेनंतर कोणीही आता वेगळे भूमिका घेणार नाही, असे जाधव म्हणाले. येत्या ८ जुलै रोजी मनसेचा मीरा-भाईंदर येथे भव्य मोर्चा निघणार असून तो मोर्चा झाल्यानंतर मीरा-भाईंदरमधील ‘म’ हा मराठी माणसाचाच राहील, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.
सुशील केडिया यांनी अशी मागितली माफी
मी टाकलेली पोस्ट चुकीच्या मानसिक अवस्थेत आणि तणावात लिहिले गेले होते. पण त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. मला राज ठाकरे यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि कृतज्ञता वाटली आहे. माझी चूक मान्य करतो आणि वातावरण शांत व्हावे अशी अपेक्षा करतो, असे केडिया यांनी स्पष्ट केले.