Thane Municipal Corporation : ठाणे : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडी उत्सवाच्या मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ठाणे महापालिकेने यंदा ऑनलाईनद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र, या सुविधेकडे आयोजकांनी पाठ फिरवत जुन्याच पद्धतीने म्हणजेच थेट पालिका कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत अर्ज केलेल्या ५५ पैकी २५ आयोजकांना पालिकेने मंडप उभारणीची परवानगी दिली असून उर्वरित अर्जांना परवानगी देण्याची प्रक्रीया सुरू आहे, अशी माहीती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून रस्ते आणि पदपथ अडवून उत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू आहे. अनेक मंडळे निम्मा रस्ताच अडवित असल्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच परिसरातील नागरिकांंना पदपथावरून जाण्यासाठी मार्गच उपलब्ध होत नव्हता. या संदर्भात उच्च न्यायलयात जनहित याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी देताना न्यायलयाने मंडप उभारणीसाठी काही मागदर्शक तत्वे आखून दिली आहेत. यानुसार रस्त्यांवर मंडप उभारणीस पालिकेकडून परवानगी देण्यात येते. त्याकरीता उत्सवाच्या आयोजकांना पालिकेकडे अर्ज दाखल करावे लागतात. अर्ज दाखल करण्यासाठी पालिका ऑनलाईन आणि थेट पालिका कार्यालयात येऊन अर्ज करण्याची सुविधा गेल्या काही वर्षांपासून उपलब्ध करून देत आहे.
गोविंदांची पंढरी अशी ओळख असलेल्या ठाणे शहरात यंदाही दहीहंडी उत्सवासाठी रस्त्यावर मंडप उभारणीकरीता परवानगी मिळावी यासाठी ५५ आयोजकांनी पालिकेकडे अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी २५ आयोजकांना पालिकेने परवानगी दिली आहे तर, ३० आयोजकांना परवानगी देण्याची प्रक्रीया सुरू आहे. मुंब्रा आणि दिवा प्रभाग समितीमध्ये दरवर्षी रस्त्यावर दहीहंडी उत्सव साजरा होतो. मात्र, या दोन्ही प्रभाग समिती क्षेत्रात मात्र मंडप उभारणीसाठी एकही अर्ज दाखल झालेला नसल्याचे चित्र आहे. मंडप उभारणीसाठी पालिकेकडे एकूण ५५ आयोजकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी ४९ आयोजकांनी पालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केले आहेत तर, ६ आयोजकांनी ऑनलाईनद्वारे अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे दहीहंडी आयोजकांनी ऑनलाईन अर्ज सुविधेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
प्रभाग समितीनिहाय आकडेवारी
प्रभाग समिती – अर्ज संख्या – परवानी दिलेली संख्या
नौपाडा-कोपरी – ९ – ३
वागळे इस्टेट – ११ – ३
लोकमान्य-सावरकर – ७ – ४
वर्तकनगर – ११ – ६
माजिवाडा-मानपाडा – ५ – २
उथळसर – ३ – २
कळवा – ९ – ५
मुंब्रा – –
दिवा – –
एकूण – ५५ – २५