ठाणे – वरळी येथे झालेल्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीची तुलना अफजलखानाशी केली. त्यांच्या या विधानावर नरेश म्हस्के आक्रमक झाले असून मुळ शिवसेना ही आज एकनाथ शिंदेंच्या सोबत आहे. उद्धव ठाकरे यांनी देशाच्या, हिंदुत्वाच्या विरोधात आघाड्या केल्या.
बाळासाहेब ठाकरे यांना ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणायलाही ते घाबरट होते. त्यामुळे जरी दिसायला अफजलखानासारखे नसले, तरी विचाराने उद्धव ठाकरे हेच खरे अफजलखान आहेत,” अशा शब्दांत म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली. नरेश म्हस्के पुढे म्हणाले, विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे अश्लिल भाषा वापरत होते. चुकीच्या पद्धतीने बोलत होते. उद्धव ठाकरे हे हारलेला माणूस असल्यामुळे त्यांच्या तोंडून अशी वक्तव्य बाहेर येत होती.
उद्धव ठाकरेंचा स्वभाव वापरा आणि फेका असा आहे. नारायण राणे, राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यासोबतही ते तसेच वागले आहेत. त्याचपद्धतीने आता त्यांनी क्राँग्रेसच पायपुसण केले आहे, असा आरोप म्हस्के यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणूक आणि पालिकेची तिजोरी डोळ्यासमोर ठेऊन विजयी मेळाव्यात भाषण केले. महाराष्ट्र आणि मराठी माणसांवर होणारा अन्याय असे मुद्दे भडकावून निवडणुका लढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे ही म्हस्के म्हणाले.