ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले बांधकाम व्यावसायिक भुषण भानुशाली यांनी खासदार संजय दीना पाटीलांच्या पुतण्यावर हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उद्वाहकामध्ये मुलाला धक्का दिल्याच्या कारणावरुन हा हल्ला केल्याचे भानुशाली यांनी पोलीस ठाण्यात स्पष्ट केले आहे. परंतू, या हल्ल्यात संजय दीना पाटील यांचा पुतण्या अभिजित पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी भानुशाली यांच्यावर श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भानुशाली यांचे अनेक छायाचित्र शिंदे गटाच्या नेत्यांसोबत असतात.
वागळे इस्टेट २२ नंबर सर्कल जवळ सेंट्रम आयटी पार्क नावाची एक उच्चभ्रु इमारत आहे. या इमारतीत असलेल्या एका हॉटेलचे मालक दिलीप रायचंदानी आणि एका नामांकित पब चे मालक अभिजित पाटील तसेच रितेष शेट्टी, गौरव शेट्टी या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सचिन मिराणी आणि नविन सावला यांच्या कार्यालयात बैठकीसाठी जात असताना, भुषण यांच्या १७ वर्षीय मुलाला त्यांचा चुकून धक्का लागला. या रागामुळे भुषण ४ ते ५ लोकांना घेवून सचिन मिराणी आणि नविन सावला यांच्या कार्यालयात गेले. त्यांच्यापाठोपाठ आणखी ८ ते १० लोक तेथे पोहोचली. त्यावेळी नविन सावला यांनी भुषण यांना तुम्ही परवानगी शिवाय आतमध्ये कसे आलात अशी विचारणा केली. तर, भुषण आणि त्यांच्यासोबत आलेल्या लोकांनी दिलीप आणि त्यांच्या मित्रांना मारहान करण्यास सुरुवात केली. तसेच कार्यालयात तोडफोड सुरु केली.
या झटापटीदरम्यान, संजय दीना पाटील यांचे पुतणे अभिजित पाटील यांच्या डोक्याला एक चहाचा कप लागून गंभीर दुखापत झाली. यात, ते बेशुद्ध झाले. त्यावेळी भुषण यांनी दिलीप यांना ‘तू रेस्टॉरंटला कसा जातो आणि रेस्टॉरंट कसा चालवतो ते मी पाहतो’ अशी धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच संजय दीना पाटील आणि त्यांचे समर्थक श्रीनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर, भूषण भानुशाली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भानुशाली नेमके कोण?
भूषण भानुशाली यांनी यापूर्वी काही काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीए म्हणून काम केले होते. ते शिवसेना (शिंदे गट) चे निकटवर्ती मानले जातात. त्यांचे अनेक छायाचित्र शिंदे गटाच्या नेत्यांसोबत असतात. या मारहाणीच्या झटापटीत ते अनेकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन बढाई मारत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.