ठाणे: स्वर्गीय आनंद दिघे यांचा सहवास मला लाभला म्हणून मी आज खासदारकी पर्यंत पोहोचू शकलो, अशी भावना खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली. या मुलाखतीच्या माध्यमातून सुरेश म्हात्रे यांनी धर्मवीर आनंद दिघे आणि त्यांचे संबंध कसे होते हे उलगडले. यात, त्यांनी दिघे यांच्यासोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला.
वयाच्या १८ वर्षी जेव्हा मी रिक्षा चालवत होतो. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे भाषणे ऐकण्याची संधी मला मिळाली. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांना देखील मी पहिल्यांदा भेटलो. आनंदाश्रमात मी जात असे तेव्हा दिघे यांचे काम पाहायचो. त्यांच्या कामाने मी भारावून गेलो होतो. तेव्हा पासून दिघे यांच्या मला आदर सन्मान वाटू लागला.
दिघे यांच्या प्रेरणेतून खऱ्या अर्थाने तेव्हापासून माझ्या समाजसेवेच्या कामाला सुरुवात झाली. दिघे यांचा सहवास मला लाभला म्हणून मी आज खासदारकी पर्यंत पोहोचू शकलो, असे सुरेश म्हात्रे यांनी या मुलाखतीत सांगितले.
१९९५ साली शाखेची स्थापना झाली तेव्हा मी उपशाखाप्रमुख होतो. उपशाखाप्रमुख ते संपर्कप्रमुख असा माझा प्रवास होता. परंतु, त्यावेळेस दिघे साहेब यांच्यातील जादू म्हणा किमया म्हणा किंवा त्यांना मिळालेला दैवी आशीर्वाद पण, त्यांच्यात जादू होती कितीही मोठा अधिकारी असू द्या किंवा नेता त्यांच्यासमोर दिघे साहेब बसले की त्या विषयावर पटकन तोडगा मिळत असे. ही ताकद फक्त त्यांच्याकडेच होती.
जेवढे ठाण्यातले त्या वेळचे नेते होते त्यापैकी असा कुठलाही नेत्या नाही जो की मला ओळखत नसेल. कारण, आम्ही खूप छोटे कार्यकर्ते होतो तरी देखील दर एक-दोन दिवसांनी साहेबांना भेटायला आनंद आश्रमात जात असे काम असो किंवा नसो साहेबांचा आशीर्वाद घ्यायचो आणि निघायचो, असे काही किस्से सुरेश म्हात्रे यांनी या मुलाखतीत उलगडले.
“धर्मवीर चषक” किस्सा
धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने १९९५ सालापासून ‘धर्मवीर चषक’ मी सुरु केले. तेव्हा दिघे साहेब स्वतः तिथे यायचे उद्घाटनासाठी असो किंवा बक्षीस समारंभासाठी साहेब यायचेच यायचे. मी एकदा सहज त्यांना म्हणालो ‘तुम्ही येतात ते ठीक आहे, पण आमची इच्छा आहे की, लालबत्ती ची गाडी म्हणजेच महापौर देखील या कार्यक्रमात आले पाहिजे.’ त्यानंतर, जेवढे महापौर होते असा एकही महापौर नाही की जे माझ्या स्पर्धेला आले नाही, असा किस्सा म्हात्रे यांनी यावेळी सांगितला.
साहेबांची ही आठवण मी कधीच विसरू शकतं नाही..
१९९८ ला एका वादामुळे आम्हाला अटक झाली होती. आमच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यावेळी दिघे साहेब हे स्वतः कापूरबावडी पोलीस स्टेशनला आले होते. आम्हाला लॉकअप मधून बाहेर काढले आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना ते म्हणाले आमची मुले मारामारी करू शकतात म्हणून त्यांच्यावर ३०७ गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु, आमची मुले चोरी, दरोडे कधीच करणार नाही. त्यामुळे ३९७ हा गुन्हा त्यांच्यावर दाखल करणे मला मान्यच नाही.
