ठाणे : दिवा येथील कचराभूमीमुळे पर्यावरणाचे नुकसान झाल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठाणे महापालिकेला १० कोटी २० लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, या निर्णयासंदर्भात आम्ही अपील करणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला.
दिवा शहरात ठाणे महापालिकेची कचराभूमी होती. ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागातील गृहसंकुले, आस्थापनांचा कचरा गोळा करून तो दिवा कचराभूमीत नेला जात होता. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज एक हजारहून अधिक टन कचरा निर्माण होतो. कचराभूमीत कचऱ्याचे डोंगर तयार झाले होते. तसेच येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही यामुळे उपस्थित झाला होता.
अनेकदा कचऱ्याला आगी लागून वायु प्रदूषण निर्माण झाले होते. कचराभूमीलगतची जैवविविधता देखील यामुळे धोक्यात आली होती. कचराभूमी बंद व्हावी यासाठी अनेक आंदोलने झाली होती. परंतु महापालिकेकडून कचराभूमीवर कचरा टाकणे सुरूच होते. अखेर ठाणे महापालिकेने दोन वर्षांपूर्वी येथील कचराभूमी हटविण्यास सुरुवात केली.
दरम्यान, या कचराभूमीमुळे जैवविविधता धोक्यात आल्याने मुंबईस्थित वनशक्ती या संस्थेने २०२२ मध्ये हरित लवादाकडे दाद मागितली होती. त्यानंतर लवादाने या संदर्भात दंड ठोठावण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाने ठाणे महापालिकेला १० कोटी २० लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहे.
या संदर्भात आम्ही अपिलात जाणार आहोत. दिवा आणि भांडार्ली येथील कचराभूमीच्या ठिकाणची जागा पूर्ववत करून दिली जाणार आहे. त्या संदर्भातला निविदा काढून ठेकेदाराची नियुक्ती अंतिम झाली आहे आणि येथील जागा पूर्ववत करण्यासाठी आमची तयारी देखील पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आम्हाला लगाविण्यात आलेला दंड रद्द करावा अशी आमची मागणी असणार आहे. – मनीष जोशी, उपायुक्त, घनकचरा विभाग, ठाणे महापालिका.