Thane Job Fraud : ठाणे : एका नामांकित बँकेत उप व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या तरुणीला सरकारी बँकेत नोकरी मिळवून देतो असे सांगत १२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्यासोबत तरुणीची ओळख मुंबईतील पंचतारांकित हाॅटेलमध्ये झाली होती. तरुणीने याप्रकरणी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट भागात फसवणूक झालेली ३० वर्षीय मुलगी राहते. ती मागील नऊ महिन्यापासून एका नामांकित बँकेत उप व्यवस्थापक म्हणून काम करत होती. सुमारे दीड वर्षांपूर्वी मैत्रीणीच्या साखरपुडा समारंभासाठी ती मुंबईतील एका पंचतारांकित हाॅटलेमध्ये गेली होती. त्यावेळी तिची ओळख डोंबिवलीच्या तरुणासोबत झाली. त्याने त्याचा व्यवसाय सल्लागाराचा असल्याचे सांगून तो तरुणांना नोकरीला लावण्याचे काम करतो असे सांगितले. तसेच तरुणीला सरकारी बँकेत काम करायचे आहे का, असल्यास १५ लाख रुपये द्यावे लागतील. मी सरकारी नोकरीचे आदेश काढू शकतो असा बनाव तरुणाने केला. त्याने तरुणीला काही माहिती सांगितल्याने तिला देखील त्याच्यावर विश्वास बसला. काही दिवसांनी त्या तो तरुण त्याच्या मैत्रीणी सोबत तरुणीला भेटण्यासाठी ठाण्यात आला. त्यावेळी त्या तरुणाने एका व्यक्तीला मोबाईलवर संपर्क साधला. त्याने त्या तरुणीशी संवाद साधत तो सरकारी बँकेत व्यवस्थापक असून त्यांच्या नोकरीचे काम होईल असे आश्वासन त्या व्यक्तीने दिले.

अन् घराला कुलूप

तरुणीला सरकारी बँकेत नोकरी लागेल अशी आशा असल्याने तिने टप्प्या टप्प्याने तरुणाच्या आईच्या बँक खात्यात आणि त्याच्या मैत्रिणीच्या बँक खात्यात १२ लाख ९६ हजार ५०० रुपये पाठविले. अनेक महिने उलटले तरीही तरुणीला नोकरी मिळत नव्हती. अखेर त्या तरुणाने करारनामा करुन नोकरी लावून देतो असे आश्वासन दिले. परंतु काही दिवसांनी त्याचा आणि त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल क्रमांक बंद येऊ लागला. सुमारे महिन्याभरापूर्वी तरुणी त्याच्या घरी गेली असता, घराला देखील कुलूप असल्याचे आढळून आले. तिने परिसरातील रहिवाशांना याबाबतची माहिती विचारली असता, त्यांनाही त्या तरुणाबद्दल काहीही माहिती नसल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३ चे कलम ३(५), ३१६(२), ३१८(४) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.