Mumbai Local : मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. कारण बदलापूर आणि वांगणीच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. त्यामुळे कर्जत मार्गावरील बदलापूर वांगणी मार्गावर खोळंबा झाला आहे. ऑफिस गाठणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना आज लेट मार्कचा त्रास सहन करावा लागणार आहे यात शंका नाही. मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरु आहे. अप आणि डाऊन मार्गावरची कर्जतवरुन सुरु असणारी वाहतूक खोळंबली आहे. रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु असते. त्यात आता रेल्वे रुळाला तडा गेल्याचं कारण समोर आलं आहे. रोज म.रे. (मध्य रेल्वे) त्याला कोण रडे अशी प्रवाशांची अवस्था आहे. मुंबई पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसचाही या लोकल वाहतुकीमुळे खोळंबा झाला आहे.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार वांगणी बदलापूरदरम्यान गोरेगाव नावाचं एक छोटं गाव आहे त्या ठिकाणी रेल्वे रुळाला तडा गेला आहे. डाऊन मार्गावरच्या रुळाला हा तडा गेला आहे. मात्र यामुळे दोन्ही बाजूची म्हणजेच अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळची वेळ ही गर्दीची असते. त्याचवेळी रुळाला तडा गेल्याची घटना घडली आहे. रेल्वे प्रशासनाकडून साधारण तास ते दीड तासाची वेळ देण्यात आली आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. मुंबई ट्रेन अपडेट्सने हे वृत्त दिलं आहे.
बदलापूर ते कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. रुळाला तडे जाण्याच्या तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. प्रवाशांची स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. रोज सकाळी चाकरमानी वेळेत ऑफिसला जाण्यासाठी निघतात. मात्र आज सकाळीच रेल्वे रुळाला तडे गेल्याची घटना डाऊन मार्गावर घडली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मुंबईतलं ऑफिस गाठण्यास उशीर होतो आहे.