मुंबई-नाशिक महामार्ग वाहतूक कोंडीत

मुंब्रा बाह्य़वळण मार्गिकेवरील वाहतूक पूर्ववत झाल्यानंतर वाहतूक कोंडीतून ठाणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता होती.

ठाणे : मुंब्रा बाह्य़वळण मार्गिकेवरील वाहतूक पूर्ववत झाल्यानंतर वाहतूक कोंडीतून ठाणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता होती. मात्र मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डय़ांमुळे ठाणेकर पुन्हा वाहतूक कोंडीत अडकले. बुधवारी दुपारी साकेत पूल ते कॅडबरी जंक्शन आणि भिवंडीतील पिंपळघपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बुजविलेले खड्डे पुन्हा उखडल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पुलावर गेल्या काही दिवसांपासून खड्डे पडले आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून खड्डे बुजविण्यात आले होते. बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे बुजविलेले खड्डे पुन्हा उखडले. त्यामुळे दुपारी २ वाजेच्या सुमारास नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर साकेत पूल ते कॅडबरी जंक्शनपर्यंत तसेच, नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर साकेत पूल ते भिवंडीतील पिंपळघपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. अवघे १० मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना पाऊण तास लागला.

गेल्या २० दिवसांपासून मुंब्रा बाह्य़वळण मार्गाची ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवरील अवजड वाहतूक बुधवारी पुन्हा सुरू झाली. मुंब्रा बाह्य़वळण मार्गे खारेगाव टोलनाका येथून गुजरात, ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांचा भारही या मार्गिकेवर आला होता. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांच्याही नाकी नऊ आले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai nashik highway traffic jam thane ssh

Next Story
काय, कुठे, कसं?
ताज्या बातम्या