विशेष सरकारी वकिलांची न्यायालयात मागणी 

शीळ-डायघर येथील लकी कंपाऊंडमधील इमारत दुर्घटनेच्या खटल्याची सुनावणी मंगळवारपासून ठाणे न्यायालयात सुरू झाली. पहिल्याच दिवशी झालेल्या सुनावणीमध्ये विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी आरोपींविरोधातील पुरावे सादर करत त्यांचा या  प्रकरणाशी असलेल्या सहभागाची माहिती न्यायालयापुढे दिली. इमारतीच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे ती पडणार, हे आरोपींना ठाऊक होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात खुनाचा आरोप निश्चित करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

मुंब्य्राजवळ लकी कंपाऊंडमधील सात मजली बेकायदा इमारत ४ एप्रिल २०१३ रोजी कोसळून ७४ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात विकासक, पालिका अधिकारी, नगरसेवक, पोलीस कर्मचारी आणि पत्रकार अशा एकूण २७ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यात ठाणे महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त दीपक चव्हाण, श्रीकांत सरमोकादम, राष्ट्रवादीचे नगरसेवक हिरा पाटील, बिल्डर जमील कुरेशी, सलीम शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल जहांगीर सय्यद, तत्कालीन साहाय्यक आयुक्त बाबासाहेब आंधळे, इमारत साहित्य पुरवठादार अफरोज अन्सारी, रियल इस्टेट एजंट जब्बार पटेल, पालिकेतील लिपिक किसन मडके, वास्तुविशारद फारूक छाप्रा, पत्रकार रफीक कामदार, कार्यकारी अभियंता सुबोध रावल, उपअभियंता रमेश इनामदार, पालिका अधिकारी श्याम थोरबोले, हरदिसुल्ला चौधरी, भागीदार सुभाष वाघमारे आणि पालिकेचा कर्मचारी रामदास बुरुड यांचा समावेश आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना विकासकाकडे सापडलेल्या डायरीतून या प्रकरणातील आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार समोर आले होते. या प्रकरणी आरोपींविरोधात शीळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी ठाणे न्यायालयात मंगळवारपासून सुरू झाली. ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांच्यापुढे ही सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात खुनाचा आरोप निश्चित करण्याची आग्रही मागणी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केली. दरम्यान, बुधवारी बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद होणार आहे.

  • अडीच तास चाललेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी आरोपींविरोधातील आरोपपत्राचे वाचन केले.
  • आरोपींचा असलेला सहभाग, आर्थिक देवाण-घेवाणीच्या नोंदी असे पुरावे हिरे यांनी न्यायालयात सादर केले.