कल्याण-डोंबिवली महापालिकेची सुविधा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे कल्याण पूर्वेतील तिसगाव भागात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी युक्त डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले आहे. पालिकेचे हे डोंबिवली, कल्याण शहरातील हे पहिलेच केंद्र आहे. डायलिसिस केंद्राचा आर्थिक दुर्बल, सामान्य गटातील रुग्णांना सर्वाधिक लाभ होणार आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसिसची प्रक्रिया महागडी असल्याने अनेक सामान्य, दुर्बल गटातील रुग्ण रास्त दरात कुठे डायलिसिसची सुविधा उपलब्ध आहे का याची चाचपणी करत असतात. अनेक रुग्ण ठाणे, मुंबई, कल्याण परिसरातील धर्मादाय संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या केंद्रांमध्ये जाऊन उपचार घेतात. डायलिसिस करून घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालिकेचे डायलिसिस केंद्र असावे आणि त्याची तातडीने उभारणी व्हावी यासाठी वैद्यकीय आरोग्य विभागाला एक प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मागील वर्षी दिले होते. 

वैद्यकीय विभागाने तयार केलेल्या प्रस्तावाला आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी तात्काळ मंजुरी दिली होती. डायलिसिस केंद्रासाठी कल्याण पूर्वेतील तिसगाव गावठाण येथील यशवंत छत्र बंगला, विजयनगर, आमराई रस्ता येथे पालिकेला सर्वसमावेशक आरक्षणातून ३,२०० चौरस फूट क्षेत्रफळाची जागा उपलब्ध झाली आहे. तळमजल्यावर ही जागा असल्याने डायलिसिससाठी येणाऱ्या इतर वयोगटातील रुग्ण, ज्येष्ठ, वृद्ध यांना जिने चढण्याचा त्रास होणार नाही, असा विचार करून ही जागा डायलिसिससाठी पसंत करण्यात आली आहे, असे शहर अभियंता सपना कोळी यांनी सांगितले.

आयुक्त डॉ. सूर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या संकल्पनेतून हे केंद्र उभे राहिले आहे.

खासगी भागीदारी तत्त्वावर केंद्र

डायलिसिस सेंटरमध्ये १० रुग्णशय्या, औषध कक्ष, परिचारिका कक्ष, डायलिसिस प्रक्रिया केंद्र, स्वच्छतागृह, वातानुकूलन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्राची उभारणी तीन महिन्यांत पूर्ण करण्यात आली. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये मे. अपेक्स किडनी केअर संस्थेतर्फे वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार आहे, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी सांगितले. 

अल्पदरांत सेवा

या डायलिसिस केंद्रामध्ये आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेत समाविष्ट होऊ न शकणाऱ्या रुग्णांना ८४९ रुपये शुल्क आकारले जाईल. एचआयव्ही रुग्णांसाठी ८५१ रुपये या अल्पदरात ही सुविधा उपलब्ध करू देण्यात आली आहे. या केंद्रामध्ये १० डायलिसिस संयंत्र आहेत. दररोज ३० रुग्णांचे डायलिसिस या केंद्राच्या माध्यमातून करण्याचे नियोजन वैद्यकीय विभागाने केले आहे. मे. अपेक्स किडनी केअर संस्थेतर्फे या केंद्रात वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal corporation first dialysis center tisgaon facility kalyan dombivali municipal corporation akp
First published on: 22-02-2022 at 00:01 IST