उल्हासनगरः उल्हासनगर शहरातील रस्ते मोकळे ठेवून रिक्षा थांबे, रस्त्यावर होणारी वाहन विक्री, सभागृहांबाहेर होणारी कोंडी आणि गर्दीच्या वेळी वाढणारी वाहनांची संख्या या सर्वांवर लक्ष ठेवत कोंडीमुक्त प्रवासासाठी उल्हासनगर महापालिका प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. नुकतीच पालिका मुख्यालयात वाहतूक शाखेच्या पोलीसांसोबत झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम दिला. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास शहर कोंडीमुक्त होण्याची आशा आहे.

शहरातील वाहतूक समस्या आणि स्मार्ट पार्किंगबाबत निर्णय घेण्यासाठी उल्हासनगर महापालिका मुख्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली. यात उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण, पालिकेचे अधिकारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपस्थित होते. यावेळी विविध मुद्द्यांवर पालिकेतील विविध विभाग आणि वाहतूक शाखेला सूचना करण्यात आल्या. यात शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये असलेल्या अनधिकृत रिक्षा थांबे, टेम्पो थांब्यांवर कारवाई करणे, रिक्षा थांबे तसेच रिक्षांची संख्या निश्चित करणे, पाहणी करून त्यांची यादी करणे आणि रिक्षा थांब्यांची आवश्यकता असल्यास अहवाल सादर करण्याचे आदेश सहायक आयुक्त आणि वाहतूक शाखेला देण्यात आले.

महानगरपालिका, वाहतूक शाखेच्या संबंधित अधिकारी यांनी पाहणी करुन अधिकृत व अनधिकृत रिक्षा थांब्याची यादी तयार करणे, अतिरिक्त रिक्षा थांब्याची आवश्यकता असल्यास पाहणी करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. कॅम्प तीन भागात रस्त्यावर चारचाकी, दुचाकी वाहनांची विक्री केली जाते. त्यामुळे रस्त्याचा काही भागही अडतो. त्यावरही नियमीतपणे कारवाईच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. शहरातील अवजड वाहनांच्या जागांचे सर्वेक्षण करून काही रस्त्यावर बॅरियर लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मुख्य रस्त्यांवर होणारी अवजड वाहनांची पार्किंग रोखण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले.

शहरातील मुख्य रस्त्यांवर १५ दिवसात पिवळे व पांढरे पट्टे मारणे. रस्त्यांवर ‘नो पार्किंग’, ‘पी१’, ‘पी२’ चे फलक लावणे. मुख्य रस्त्यांच्या कडेला दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पाकींगची व्यवस्था करणे आणि तसे फलक लावून पट्टे मारले जाणार आहेत. रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणाऱ्या विकासकांविरुध्द कारवाईच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बस थांबे मोकळे करा

उल्हासनगर महापालिकेच्या परिवहन प्रकल्पातील बस थांब्याशेजारीच रिक्षा उभ्या राहत असल्याने प्रवाशांना आणि बस चालकांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे थांब्यांवर उभ्या राहत असलेल्या रिक्षांवर कारवाई करणे, रिक्षा उभ्या राहू नयेत यासाठी महत्त्वाच्या बस थांब्यावर ट्रफीक वॉर्डनची नियुक्ती करणे आणि परिवहन विभागाने महत्त्वाच्या बस थांब्यावर वाहतूक निरिक्षकाची नियुक्ती करण्याचेही सूचवण्यात आले आहे. गर्दीच्या वेळी वार्डनची नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. मोठ्या हॉटेल, लग्न सभागृह यांच्याबाहेर होणारी अवैध पार्किंगबाबतही निर्णय घेण्याचे वाहतूक पोलिसांनी सांगण्यात आले आहे. यावर निर्णयावर कालबद्ध अमंलबजावणी केल्यास शहरातील कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.