सांस्कृतिक शहर असणाऱ्या ठाणे शहरात विविध क्रीडा विषयक उपक्रमही नियमितपणे राबविले जातात. दादोजी कोंडदेव स्टेडियम या उपक्रमांचा केंद्रबिंदू आहे. अलीकडेच या स्टेडियममध्ये अ‍ॅथलेटिक्स या खेळासाठी सिंथेटिक ट्रॅक तसेच ढोकाळी येथे बास्केट बॉल कोर्ट बनविण्यात आला. दर वर्षी शहरात भरवली जाणारी वर्षां मॅरेथॉन ही राज्यातील एक महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. इतकेच नव्हे तर दर वर्षी ऑगस्टमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचेही आयोजन महापालिकेतर्फे करण्यात येते. ठाण्यातील एकूणच क्रीडाविषयक चळवळीविषयी क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांच्याशी साधलेला हा संवाद..
मीनल पालांडे, महापालिका क्रीडा अधिकारी
* महापालिकेच्या वतीने क्रीडा विभागाला पोषक कोणकोणते उपक्रम राबविले जातात?
ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एकमेव महापालिका आहे, जी खेळासाठी वर्षभरात दीड ते दोन कोटी रुपये खर्च करते. त्यामुळे पालिकेची क्रीडा अधिकारी म्हणून मला अभिमान वाटतो. वर्षभरात महापौर चषक मॅरेथॉन, हॉलीबॉल अशा अनेक स्पर्धा ठाणे महापालिकेतर्फे आयोजित केल्या जातात. यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. शहरातील खेळांची चळवळ ही खूप मोठी आहे. अनेक खेळांमध्ये श्रद्धा, अक्षय्या आदींसारखे शहरातील खेळाडू महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत ही ठाणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
* आपल्याकडे क्रीडा विभागात अजूनही क्रिकेटचा वरचष्मा आहे, त्याव्यतिरिक्त शहरात कोणकोणत्या क्रीडा स्पर्धा होतात?
खेळाला इंग्रजीमध्ये ‘स्पोर्ट्स’ असे म्हणतात. त्यातील ‘एस’ म्हणजे स्पिरिट, ‘पी’ म्हणजे पेशन्स, ‘ओ’ म्हणजे ऑर्गनायझेशन, ‘आर’ म्हणजे रॅकिंग, ‘टी’ म्हणजे टेन्शन. या गोष्टी लक्षात ठेवूनच खेळाडूने खेळ खेळावे. खेळामुळे शरीराला व्यायाम करण्याची शिस्त लागते. उत्साह तसेच चैतन्य निर्माण होते. अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, मैदानी खेळ, मल्लखांब, लांब उडी, स्विमिंग,मॅरेथॉन आदींसारखे खेळ ठाणे जिल्ह्य़ात खेळले जातात. ठाणे महानगरपालिकेतर्फे विविध प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन दिले जाते. या खेळामध्ये महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील अनेक खेळाडू हिरीरीने भाग घेत असतात.
* जिल्हा परिषद तसेच महापलिकेच्या शाळेत कोणकोणते खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे? ठाणे ग्रामीणमधून खेळासाठी कसा प्रतिसाद आहे?
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी आम्ही सतत प्रोत्साहन देत असतो. खो-खो, कबड्डी यांसारख्या खेळांचा प्रसार होणे आवश्यक आहे. त्याशिवाय ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक, अ‍ॅॅथलेटिक्स आदी खेळही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात व्यायामाविषयी आवड निर्माण होईल. त्यांची शारीरिक क्षमता वाढेल. खेळांमुळे मनही प्रसन्न राहते. त्यामुळे जास्तीत जास्त आंतरशालेय स्पर्धा आम्ही आयोजित करतो. ठाणे ग्रामीणमधील मुली खो-खो, कबड्डी आदी खेळ खूप छान खेळतात. बदलापूर येथील काही मुली खो-खो या खेळामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. शिवाय ग्रामीण भागामधील मुलांमध्ये शूटिंग, धावणे, मल्लखांब आदी खेळांमध्येही खूप रस असतो. त्यांनी पुढे यावे आणि आपले खेळ सादर करावेत, अशा खेळाडूंना मदत करण्यासाठी क्रीडा विभाग नेहमीच पुढाकार घेईल.
* दादोजी कोंडदेव स्टेडियमवर कोणकोणते खेळ खेळले जातात ?
दादोजी कोंडदेव स्टेडियमवर सर्वच खेळ उत्तमरीत्या खेळले जातात. स्टेडियममधील क्रि केट मैदानासाठी जमीन सतत हिरवीगार ठेवण्याचा प्रयत्न सुरू असतो. क्रिकेटची रणजी मॅच ठाण्यात व्हावी यासाठी सर्वाचेच प्रयत्न सुरू आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंना सराव करता यावा म्हणून स्टेडियमवर नुकताच एक सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला आहे. या सिंथेटिक ट्रॅकवर अनेक खेळाडू सराव करताना दिसत आहेत. शिवाय सध्या शूटिंग रेंज तयार करण्यात येत आहे.
* उत्तम खेळाडू बनण्यासाठी पालकांनी काय करणे अपेक्षित आहे?
मुलांचा कल कशामध्ये आहे ते पहावे. त्यानंतर लहानपणापासून व्यायाम, जिम्नॅस्टिक, अ‍ॅथलेटिक्स या खेळांचे त्यांना शिक्षण द्यावे. हे शिक्षण देताना चांगली संस्था निवडावी. कारण आजकल अनेक संस्था आहेत. मात्र त्यांपैकी काही संस्था सुरू होतात आणि काही काळातच बंद पडतात. त्यामुळे संस्थांची चौकसपणे विचारपूस करावी. मुलांना एका संघात खेळविण्यापेक्षा एकटे खेळायला प्राधान्य द्या. जेव्हा तो मुलगा-मुलगी स्वत:चे यश मिळवेल, तेव्हा तो किंवा ती संघाच्या यशातही मोलाचा वाटा उचलते. पालकांच्या मनात भेदभाव होण्याची जी भीती असते ती अशा वैयक्तिक खेळांमुळे कमी होते. मुलांच्या आहारात भाजी, फळ, कडधान्य, दूध, मांसाहारी असेल तर अंड आदी पदार्थाचा समावेश करावा. नियमित सराव हा यशाचा पाया आहे. महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल, सुमा शिरूर, अभिनव बिंद्रा किती कठोर मेहनत करतात, हे पालकांनी मुलांना सांगावे. खेळामुळे करिअरचे नुकसान होत नाही. उलट नोकरी मिळण्यास मदत होते.
* काही नवे क्रीडाप्रकार रूढ झाले आहेत, ते कोणते?
पूर्वी एकूण ७१ क्रीडाप्रकार होते. आता ज्युडो, कराटेमधील काही प्रकारांना खेळांचा दर्जा मिळाला आहे. स्क्वॉश रॅकेट हाही एक क्रीडा प्रकार आहे. सरकारकडून जरी या खेळांना मान्यता मिळाली असली तरी त्या खेळाचे नियम, अटी अजून आमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. एकदा का खेळांचे नियम कळले की शालेय जीवनात तसेच स्टेडियममध्ये त्या खेळाचा जास्तीतजास्त सराव व्हावा यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नशील राहू.
* ज्येष्ठ नागरिकांनाही खेळांमध्ये रस असतो. मात्र वयोपरत्वे त्यांना ते जमत नाही. त्यांच्यासाठी काही सोय केली आहे का?
ज्येष्ठ नागरिक धावण्यासारखे अथवा शरीराला त्रास होईल असे खेळ खेळू शकत नाहीत. अशा वेळी कमी दमवणारे खेळ म्हणजे बॅडमिंटन तसेच कॅरम, बुद्धिबळ या खेळांसाठी स्टेडियममध्ये सोय केली आहे. सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक या सुविधांचा लाभ घेत असतात. त्यांची ऊर्जा पाहून तरुण खेळाडूंनाही खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
* सध्या क्रिकेटखालोखाल कबड्डीला लोकप्रियता मिळतेय, हे चांगले लक्षण आहे, नाही का?
मध्यंतरी या खेळाबद्दल खेळाडू आणि रसिक दोन्ही आघाडय़ांवर उदासीनता होती. मात्र आता प्रो-कबड्डीमुळे कबड्डी या खेळाला अल्पावधीतच ग्लॅमर आले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील मुला-मुलींनी उत्तमरीत्या कबड्डी खेळावी. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणही देण्यात येते. त्यांनी स्टेडियमवर येऊन सराव करावा असे आवाहन एक खेळाडू म्हणून मी करेन. महाराष्ट्रातील रांगडा खेळ म्हणून कबड्डीची ओळख आहे, ती आपणच टिकवली पाहिजे असे मला वाटते.
* फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळण्यासाठी ठाण्यात मैदाने नाहीत. त्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत?
मुळातच जागा कमी असल्याने फुटबॉल मैदाने ठाण्यात नाहीत हे खरे आहे. मात्र त्यासाठी प्रयत्न सुरू असून सध्या सचिन तेंडुलकर मिनी फुटबॉल मैदान वीर सावरकर नगर येथे तयार केले आहे. मात्र मोठे मैदानही तयार करणार आहोत. बास्केटबॉलसाठीही तसे कोर्ट (जागा) नसल्याने खेळता येत नाही. पूर्वी सेंट जॉन शाळेत या खेळाचा सराव केला जात होता. मात्र आता कोर्ट कमी झाले आहेत. मात्र ढोकाळी येथे बास्केटबॉल कोर्ट तयार केला आहे. त्याचेही नुकतेच उद्घाटन केले असून तिथे भरपूर मुले येथे खेळताना दिसतात.
मुलाखत- भाग्यश्री प्रधान