मूळ बाधितांचा जुन्या जागेवरही ताबा, बनावट बाधितांचाही समावेश

ठाणे : ठाण्यातील लोकमान्यनगर भागातील हत्तीपूल ते शास्त्रीनगर भागातील बाधितांचे बीएसयूपीच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्यात आलेले असतानाही त्यापैकी काही जणांनी जुन्या जागेवरील कब्जा कायम ठेवला आहे. तर काही जण बाधित नसतानाही त्यांना बीएसयुपी घरांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

याच मुद्दय़ावरून नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी धरलेल्या आग्रहानुसार पालिका प्रशासनाने आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने एक पथक तयार केले असून या पथकामार्फत घर आणि गाळे वाटपाची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. 

ठाणे महापालिका क्षेत्रात काही वर्षांपूर्वी रस्ते रुंदीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत लोकमान्यनगर येथील हत्ती पूल ते शास्त्रीनगर या भागातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. या कामात काहींची घरे तर काहींची दुकाने बाधित झाली होती. अशा १९८ बाधितांची पालिका प्रशासनाने यादी तयार केली होती. यापैकी काही बाधितांना धर्मवीरनगर येथील बीएसयुपी योजनेतील घरे तर मीलन हाईटस येथील गाळे देण्यात आले होते. काही बाधितांचे पुनर्वसन झालेले नाही. याच मुद्दय़ावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला यांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत टीका केली होती.

काही बाधितांना गाळे मिळाले आहेत तर, बाधित नसलेल्यांनाही गाळय़ांचे वाटप झाले आहे. त्यामुळे मूळ बाधित गाळय़ापासून वंचित राहिले आहेत. गाळे मिळालेल्यांमध्ये पालिका अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, अशा आरोपही त्यांनी केला होता. बीएसयूपीच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्यात आलेले असतानाही त्यापैकी काही जणांनी जुन्या जागेवरील कब्जा कायम ठेवला आहे, असा दावाही त्यांनी केला होता. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचा आग्रह त्यांनी धरला होता. या आग्रहानंतर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून या कामासाठी त्यांनी पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची स्थावर मालमत्ता विभागात नियुक्ती केली आहे.

धर्मवीरनगर येथील बीएसयुपी योजनेतील घरे तर मीलन हाईटस येथील गाळे वाटपाची पाहणी करून त्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.