अंबरनाथ: अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी नगर भागात असलेल्या शिवसेना शाखेच्या जवळच्या वर्दळीच्या चौकात एका व्यक्तीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. हा व्यक्ती ३४ वर्षांचा असून भर चौकात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या स्थळापासून शिवाजीनगर पोलीस ठाणे अवघ्या काही अंतरावर आहे. या ठिकाणी असलेला एक सीसीटीव्ही कॅमेरा राजकीय पक्षाच्या बॅनरने झाकला गेल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे तपासात आरोपी कैद होऊ शकलेले नाहीत.

अंबरनाथ शहरातील पूर्व भागात असलेला शिवाजी नगर हा सर्वात जुना भाग म्हणून ओळखला जातो. याच भागात चौकात शिवसेना शाखा आहे. येथे अंबरनाथ स्थानक आणि आनंद नगर औद्योगिक वसाहत तसेच काटई राज्यमार्गावर जाण्यासाठी महत्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या भागात कायम वाहनांची आणि माणसांची गर्दी असते. मात्र याच भागात एका व्यक्तीचा गळा चिरलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

सोमवारी रात्री साडे बाराच्या सुमारास या भागात एका चहा विक्रेत्याच्या दुकानापुढे एक व्यक्ती रस्त्यावर पडलेला दिसला. अनेकांना तो मद्यधुंद असावा असे वाटले. त्यामुळे काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र हालचाल होत नसल्याने संशय आल्याने काही जणांनी शेजारीच असलेल्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता. त्या आरोपीचा गळा चिरल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. त्याच्या डोक्यावरही जखम झाली होती. पोलिसांनी तपासासाठी आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासण्याचा प्रयत्न केला असता या परिसरात शिवसेना शाखेसमोरच असलेला एक सीसीटीव्ही होता. मात्र एका राजकीय पक्षाच्या वह्या वाटपाच्या बॅनरमुळे हा सीसीटीव्ही कॅमेरा झाकला गेला होता. त्यामुळे आरोपीचा शोध घेण्यात आणखी अडचण निर्माण झाली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी अधिक तपास केला असता हा मृत व्यक्ती निजामुद्दीन अन्सारी असल्याचे समोर आले. हा व्यक्ती मुळचा झारखंड येथील राहणारा असून येथे बांधकामाच्या ठिकाणी काम करत होता. या अतिशय वर्दळीच्या चौकात हत्या होत असतांना कुणीही कसे पाहिले नाही, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. या हत्येबाबत पोलिसांची विविधे पथके तपास करत असून लवकरच आरोपीचा शोध घेतला जाईल, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.