सांस्कृतिक मैफलींचा वसंतोत्सव
डोंबिवलीच्या सांस्कृतिक विश्वातील एक ठळक नाव असलेल्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही दर्जेदार कार्यक्रमांचा समावेश असलेला वसंतोत्सव या आठवडय़ात टिळकनगर शाळेच्या प्रांगणात सादर केला जाणार आहे.
शुक्रवार, १५ एप्रिल रोजी वसंतोत्सवाच्या पहिल्या सत्रात स्वरसंचित हा परंपरागत सुरांची कहाणी सांगणारा विशेष कार्यक्रम कमलेश भडकमकर आणि वर्षां भावे सादर करणार आहेत. त्यात बडे गुलामअली खाँ, पं. कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे, पं. जीतेंद्र अभिषेकी, नसरत फतेहअली खान, सुधीर फडके, सुरेश वाडकर, बेगम अख्तर, किशोरी आमोणकर, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे, लता मंगेशकर, आशा भोसले, सुलोचना चव्हाण यांची गायकी या कार्यक्रमातून सादर केली जाईल. विश्वजीत बोरवणकर, उर्मिला धनगर, मिथीलेश पाटणकर, मधुरा कुंभार आणि कनकश्री भट गाणी सादर करतील. महेश खानोलकर, सागर साठे, वरद कवठापूरकर, मनीष कुलकर्णी, स्वप्निल भिसे, हनुमंत रावडे आणि विजय जाधव वाद्यसंगीताची बाजू सांभाळतील.
वसंतोत्सवाच्या दुसऱ्या पुष्पात शनिवारी डोंबिवलीकर गायक विनायक जोशी भावगीत परंपरेला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘स्वरभावयात्रा’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या स्वरसोहळ्यात रवींद्र साठे, रंजना जोगळेकर, डॉ. मृदुला दाढे-जोशी, नीलाक्षी पेंढारकर, रेश्मा कुलकर्णी, मानसी जोशी, रेश्मा कुलकर्णी आणि विनायक जोशी गाणी सादर करणार आहेत. सूत्रसंचलनाची बाजू समिरा गुजर-जोशी सांभाळणार आहेत.
वसंतोत्सवाच्या समारोप पुष्पात पं. जयतीर्थ मेवुंडी अभंगवाणी सादर करतील. भक्तिसंगीताच्या या मैफलीचे सूत्र संचालन भूषण करंदीकर करणार असून त्यांना साथसंगत शंतनू शुक्ला, संतोष घंटे, सूर्यकांत सुर्वे आणि मनोज हे करणार
आहेत.
कधी- शुक्रवार ते रविवार, १५ ते १७ एप्रिल, वेळ-सायंकाळी ६.३० वाजता
कुठे -टिळक नगर विद्या मंदिर शाळेचे पटांगण, डोंबिवली (पू.)
एकसष्टीनिमित्त पुन्हा एकदा ‘गीतरामायण’
मराठी माणसाच्या भावविश्वात ‘गीत रामायण’ अढळ स्थानी आहे. ग. दि. माडगुळकर आणि सुधीर फडके या दोन प्रतिभावंतांनी साकारलेले हे स्वरकाव्य गेली सहा दशके मराठी मनांवर अधिराज्य गाजवत आहे. १ एप्रिल १९५५ रोजी या गीतमालेतील पहिले गीत सादर झाले. त्यानंतर आठवडय़ाला एक याश्रेणीने सलग ५६ गाणी सादर झाली. ती गाणी ऐकण्यासाठी श्रोते रेडिओला कान लावून असत. एकसष्टी आणि रामनवमी याचे औचित्य साधून मुंबई-ठाण्यात पुन्हा एकदा या आठवडय़ात गीत रामायणच्या मैफली रंगाई संस्थेने आयोजित केल्या आहेत. त्यातली पहिली मैफल गुरुवारी डोंबिवलीत झाली. शुक्रवारी १५ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता गडकरी रंगायतनमध्ये दुसरी मैफल होईल. शनिवार १६ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात तिसरी मैफल होईल. सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्रीधर फडके त्या सुवर्णयुगाची आठवण या मैफलींच्या माध्यमातून रसिकांना करून देणार आहेत.
कार्टून चित्रांची धमाल
दूरचित्रवाणीवर दररोज पाहत असलेले छोटा भीम, स्पायडर मॅन, मिकीमाऊस हे कार्टुन्स विश्वातील नायक लहानग्यांना प्रिय असतातच, पण रोजच्या धकाधकीच्या तणावपूर्ण जीवनात विरंगुळा म्हणून मोठय़ांनाही या व्यक्तिरेखा आवडतात. लहान मुलांनी पडद्यावर पाहिलेले हे भावविश्व ते चित्राच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे कार्टुन्स रेखाटण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी कम्माल कार्टुन्स या शिबिराचे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले आहे.
चित्र, हास्यचित्र, व्यंगचित्र, कॅलिग्राफी, सूचक शब्द, वाक्य, पंचलाइन्स तसेच छोटा भीम, स्पायडर मॅन, मिकिमाऊस अशा विविध कार्टुन व्यक्तिरेखा काढण्याचे सोपे तंत्र कार्यशाळेत शिकण्याची संधी मिळणार आहे. सहभाग घेण्यासाठी संपर्क- कल्याण : अश्विनी कुलकर्णी-८०९७८८८६९४ आणि डोंबिवली : अमृता लिमये-९८९२७७७७६८. नुकत्याच पडलेल्या सुट्टीचा सदुपयोग करून घेण्यासाठी हे शिबीर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
कधी – १९ एप्रिल ते २२ एप्रिल
कुठे – आस्था कॉमर्स क्लासेस, वीर सावरकर मार्ग, डोंबिवली (पू.) आणि कुलकर्णी सभागृह, श्रीकांत को-ऑप. सोसायटी पोस्ट ऑफिससमोर, कल्याण (प.)
नावीन्यपूर्ण पदार्थाची पाकशाळा
घरी कुणी पाहुणा येणार असेल तर काही तरी वेगळी आणि चविष्ट डिश बनवून त्याला प्रभावित करण्याचा बहुतेक आतिथ्यशील गृहिणींचा प्रयत्न असतो. अशा प्रकारचे नावीन्यपूर्ण पदार्थ आपल्यालाही करता यावेत, अशी इच्छा असणाऱ्यांसाठी कोरम मॉलमध्ये येत्या बुधवारी २० एप्रिल रोजी विशेष पाककृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत मिनी स्प्रिंग रोल्स, मशरूम क्रोक्यूट्स, व्हेज टेम्प्यूरा, चीज स्टिक्स अशा नवनवीन पाककृती तज्ज्ञ शेफ शिकविणार आहेत.
कधी – बुधवार, २० एप्रिल, वेळ – दुपारी ३ ते रात्री ८
कुठे – कोरम मॉल, मंगल पांडे मार्ग, ठाणे (प.)
लहानग्यांच्या भेटीला लेगो पोलिसमॅन
सध्या शाळांना सुट्टी लागली आहे. आपली सुट्टी छान जावी यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे बेत आखत आहेत. सुट्टीचा हा माहोल लक्षात घेऊन येत्या शनिवार-रविवारी कोरम मॉलमध्ये मुलांना त्यांचा लाडका लेगो पोलीसमॅन बनविण्याची संधी फनस्कूलने उपलब्ध करून दिली आहे. ३० हजार विटांपासून सात फूट उंचीचा लेगो पोलीसमॅन मुलांना बनविता येईल.
कधी-शनिवार-रविवार, १६-१७ एप्रिल, वेळ-दुपारी १२ वाजल्यापासून
कुठे- कोरम मॉल, कॅडबरी जंक्शन जवळ, ठाणे (प.)
कहाणी पाण्याची..
सध्या सर्वत्र दुष्काळाची चर्चा आहे. त्याबाबतीत बरेच काही लिहून येत आहे. मात्र शब्दांपेक्षा चित्रांच्या माध्यमातून एखादी बाब अधिक ठळकपणे मांडता येते. दुष्काळाची समस्याही त्याला अपवाद नाही. ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे हे वास्तव छायाचित्रांच्या माध्यमातून मांडणारा ‘द स्टोरी ऑफ वॉटर’ हा स्लाइड शो येत्या रविवारी ठाणेकरांना पाहता येणार आहे. प्रवीण देशपांडे, संजय नाईक, माधवी नाईक यांनी काढली आहेत. फोटो सर्कल सोसायटीतर्फे आयोजित हा स्लाइड शो विनामूल्य पाहता येईल. मात्र त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. संपर्क-९७०५५२२३३.
कधी – रविवार, १७ एप्रिल, वेळ – सायंकाळी ५.३० वाजता
कुठे – ठाणे कलाभवन, कापूरबावडी, ठाणे (प.)
ताऱ्यांची पार्टी
आकाशातील एखादा साधा तारा पाहायचा म्हटले तरी आपल्याला मोकळ्या परिसराचा किंवा गच्चीचा आसरा घ्यावा लागतो. आकाशातील ग्रह, तारे त्यांची वैशिष्टय़े जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी ताऱ्यांची पार्टी हा उत्तम उपक्रम या आठवडय़ात आयोजित करण्यात आला आहे. ‘ओसिस फॉर नेशन’ या संस्थेच्या वतीने ताऱ्यांच्या या पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. ताऱ्यांसोबतच चंद्र, मंगळ, शनी, राशी नक्षत्र यांचीही ओळख तुम्हाला करून दिली जाणार आहे. कल्याणपासून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या मामणोली गावात तुम्हाला आकाशातील हा सुंदर नजारा पाहता येणार आहे. २२ एप्रिलला उल्का वर्षांव होत आहे. त्याची सुरुवात १६ एप्रिलपासून होणार आहे. वीणा या ताऱ्यांच्या समूहातील अभिजीत या ताऱ्याची ओळख तुम्हाला या पार्टीत करून दिली जाईल. तसेच ९ मे रोजी बुध ग्रहाच्या होणाऱ्या अधिभ्रमणाविषयी माहिती या पार्टीदरम्यान दिली जाणार आहे.
कधी – १७ व १७ एप्रिल, वेळ – शनिवारी सायंकाळी ७ वाजता, रविवारी सायंकाळी ६ वाजता
कुठे – दत्तात्रय आश्रम, पोटगांव, मामणोली, कल्याण (प.)
निसर्ग छायाचित्रे आणि लघुपटांचे प्रदर्शन
पर्यावरणाच्या सान्निध्यात पर्यटक म्हणून हिंडताना ते क्षण कॅमेरात टिपण्याचा मोह आवरत नाही. जे नवीन पाहिले ते कॅमेऱ्यात टिपण्याची संधी छायाचित्रकार शोधत असतात. पर्यटकांचे ट्रेक असो, जंगलात वावरणारा एखादा प्राणी असो किंवा लहान बाळाचे हसणे.. हे सर्वच क्षण कायम आठवणीत राहतात. रानवाटा प्रस्तुत आरंभ छायाचित्र प्रदर्शनात वेगवेगळ्या विषयावर टिपलेली छायाचित्रे पहायला मिळणार आहेत. वन्यजीव, पक्षी, पर्यटनस्थळे यासारखे विषय मांडण्यात येणार आहेत. स्वित्र्झलडमधील शिलॉन कॅसल, महाराष्ट्र देशा आणि पर्यावरणविषयक चित्रफीत पाहण्याची संधीही मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडण्यात आलेले ‘ताडोबा डायरीज’ आणि ‘कोकण’ हे लघुपट प्रदर्शनात दाखवण्यात येणार आहेत.
कधी – १४ ते १७ एप्रिल, वेळ – स. १०
कुठे – ठाणे कलाभवन, कापूरबावडी, ठाणे.
लहान मुलांसाठी चित्रपट महोत्सव
परीक्षांचा हंगाम संपून आता मुलांना सुट्टय़ा लागल्या आहेत. त्यामुळे आठवडय़ातील सातही दिवस रविवार अशी परिस्थिती आहे. मुलांची ही सुट्टी खऱ्या अर्थाने कारणी लागावी म्हणून प्रतिमा फिल्म सोसायटी आणि डोंबिवली जिमखाना यांच्या वतीने दुसऱ्या बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले आहे. या महोत्सवात मुलांना मजिद मजिदी या इराणी दिग्दर्शकाचे ‘चिल्ड्रेन्सऑफ हेवन व ‘कलर ऑफ पॅराडाइज हे दोन चित्रपट, इंग्रजी भाषेतील लॉरेल अॅण्ड हार्डी व मराठी भाषेतील ‘श्यामची आई’ असे चार चित्रपट दाखविले जाणार आहेत. चित्रपटांच्या या मेजवानीसोबतच त्यांना रविवारी संध्याकाळी आचार्य अत्रे यांचे नातू ‘अॅड. राजेंद्र पै’ व श्यामची आई चित्रपटात श्याम ही व्यक्तिरेखा साकारणारे ‘माधव वझे’ यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. ६ ते १६ वर्षे वयाच्या मुलांसाठी विनामूल्य प्रवेश असून आधी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी प्रतिमा फिल्म सोसायटीचे कार्यालय, डोंबिवली जिमखाना, गद्रेबंधू यांचे फडके रोडवरील दुकान येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी संपर्क – ९८२०२१०८२४.
कधी – १६ व १७ एप्रिल वेळ – संध्या. ५ ते ९
कुठे – डोंबिवली जिमखाना, औद्योगिक निवासी विभाग, डोंबिवली (पू.)