नव्या पुलाचे बांधकाम अर्धवट; जुना पूल वाहून जाण्याचा धोका

नायगाव पूर्वेच्या नागरिकांना स्थानकाहून जाण्यासाठी एकमेव मार्ग असलेला नायगाव खाडीवरील पूल अधांतरीच लटकलेला आहे. ब्रिटिशकालीन जूना पूल जर्जर झाला असून तो पावसाळय़ात कधीही कोसळण्याचा धोका आहे. दोन वर्षांपासून तयार करण्यात येत असलेल्या नव्या पुलाचे कामही अर्धवट अवस्थेत आहे. मेरिटाइम बोर्डाने पुलाची उंची वाढवण्याचे आदेश दिल्याने नवीन अडचण निर्माण झाली आहे. हा पूल पूर्ण करण्यासाठी तीनदा मुदतवाढ देण्यात आली असून तिसरी मुदत मे महिन्यातच संपत आहे.

नायगाव पूर्वेकडील नागरिकांना रेल्वे स्थानकात येण्यासाठी खाडी पार करावी लागते. या खाडीवरील पादचारी पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने या खाडीवरून नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेतले होते. २०१४मध्ये या कामाच्या निविदा काढून कार्यादेश काढण्यात आले. या पुलाचे काम प्रशासनाने ‘मे.अजयपाल मंगल अ‍ॅण्ड कंपनी’ या ठेकेदाराकडे सोपवले होते. मात्र कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे हा पूल मार्च २०१६पर्यंत पूर्ण होण्याचे आश्वासन पीडब्ल्यूडीने दिले होते, ते पूर्ण होऊ  शकले नाही. त्याचा खर्च ५ कोटी २० लाख रुपये होता. मात्र विविध कारणांमुळे या पुलाचे काम रखडले होते. हा पूल मार्च २०१६ मध्ये पूर्ण होणार होता. त्यानंतर कामाला मुदतवाढ देण्यात आली.

दुसरी मुदत डिसेंबर २०१६पर्यंत होती, तरीही तो पूर्ण झाला नाही.  मे २०१७पर्यंत पुलाचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र अद्यापही या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही.

जुना पूल धोकादायक

रखडलेले प्रकल्प हे नागरिकांना नवीन नाहीत. पण नायगाव खाडीवरील एकमेव पादचारी पूल अत्यंत धोकादायक असून या पावसात तो वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. या पुलाच्या लोखंडी प्लेट गंजल्या आहेत. यापूर्वी पालिकेने दोन वेळा डागडुजी केली होती. खाडीचे वाढलेले पाणी, पुलावरील वाढलेली वर्दळ यामुळे हा पूल जास्त भार सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे नागरिकांना या पुलावरून जीव मुठीत धरून जावे लागत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मोटारसायकलींना या पुलावरून बंदी घालण्यात आली आहे.

पूल नव्हे, सामान वाहून नेण्याची सोय

नायगाव पूर्वेला जोडणारा हा ब्रिटिशकालीन पूल रहिवाशांच्या प्रवासासाठी नव्हता. नायगाव पूर्वेचे रहिवासी पूर्वी बोटीने खाडी पार करत असे. नायगाव रेल्वे स्थानकाची निर्मिती करताना रेल्वेच्या ठेकेदाराने सामान वाहून नेण्यासाठी खाडीवर हा पूल बांधलेला होता. ठेकेदाराचे काम संपले आणि त्याने हा पूल तसाच ठेवला. बोटीतून प्रवास करण्याऐवजी लोकांनी या पादचारी पुलाचा वापर सुरू केला. सुमारे ३५ ते ४० वर्षांपासून हा पूल टिकून आहे हे विशेष.

रखडण्यास कारण की..

सुरुवातीला मिठागराच्या जागेची अडचण असल्याचे कारण देण्यात आले होते. ती अडचण दूर झाली तरी काम रखडले आहे. या रखडलेल्या कामाबाबत बोलताना स्थानिक नगरसेवक कन्हैय्या भोईर यांनी सांगितले की, या खाडीतून जलवाहतूक सुरू करायची असल्याने मेरीटाईम बोर्डाने पुलाची उंची सहा मीटर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नवीन अडचण निर्माण झाली आहे. वाढलेल्या उंचीमुळे पुलाचा उतार हा नव्याने तयार होणाऱ्या एमएमआरडीएच्या उड्डाण पुलाच्या मार्गातून जाणार आहे. या दोन्ही पुलांचे उताराच्या तांत्रिक बाबी तपासून पुलाच्या रचनेत फेरबदल करावे लागणार आहेत. नायगाव खाडीवरील पुलाची उंची जास्त असल्याने पुलाच्या उतारास जोडण्यापूर्वी एक मोठी मार्गिका (राफ्ट) तयार करणे आवश्यक आहे. या नव्या अडचणीमुळे पुलाचे काम रखडले आहे. एमएमआरडीएचे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांच्यात या कामाबाबत संयुक्त बैठकही झाली होती. मात्र त्यावर तोडगा निघालेला नाही.

उतारामुळे नव्या पुलाच्या कामास विलंब झाला आहे. पुलाचे काम पूर्ण होत आले होते, पण उतार नसल्याने आता पुढचे काम रखडले आहे. पंरतु येत्या दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

-राजेंद्र जगदाळे,

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग