काही माणसांचा स्वभाव ‘मी आणि माझे’तर काहींचा ‘मी सर्वाचा’असा असतो. काही ना काही ‘उद्योग’ ते सतत करीत असतात. थोडक्यात ‘लष्कराच्या भाकरी भाजणे’ त्यांना आवडते. मुंबईत ग्रॅण्ट रोड येथे राहणारे नंदकिशोर साळवी हे याच गटातील. मराठी भाषा जतन आणि संवर्धन हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय. असा एखादा विषय आढळला की त्याची तड लागेपर्यंत महापालिका, राज्य शासन ते थेट केंद्र शासनाच्या पातळीपर्यंत ते पत्रव्यवहार करून, प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन ते सतत पाठपुरावा करीत असतात. याबरोबरच लहानसहान समस्या सोडविणे हाही त्यांचा छंद आहे.
साळवी कुटुंबीय मूळचे रत्नागिरी जिल्ह्य़ातील टेंबे या गावचे. साळवी यांचे वडील बाळाराम साळवी हे नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आले. ते टपाल खात्यात ‘पोस्टमास्तर’ म्हणून नोकरी करीत होते. नंदकिशोर साळवी यांचे शालेय शिक्षण सांताक्रूझ येथील शेठ आनंदीलाल पोद्दार हायस्कूलमध्ये तर ‘इंटर आर्ट्स’पर्यंतचे शिक्षण सिद्धार्थ महाविद्यालयात झाले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण सोडून त्यांनी अर्थार्जनासाठी नोकरीला सुरुवात केली. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ येथे लिपिक विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून काही काळ तसेच बॉयलर उत्पादन करणाऱ्या ‘आयएईसी’ या कंपनीत ‘वरिष्ठ साहाय्यक’ म्हणूनही त्यांनी काही काळ नोकरी केली. पुढे एक्सरे मशीनसाठी लागणाऱ्या उपकरणाच्या ‘पिक्स मेडिकल’ कंपनीत जनसंपर्क अधिकारी म्हणून नोकरी केली आणि २००५ मध्ये येथून ते निवृत्त झाले.
सामाजिक कामाची साळवी यांना पहिल्यापासूनच आवड. ही प्रेरणा आपल्याला वडिलांपासून मिळाल्याचे ते सांगतात. छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ हे नाव इंग्रजी आणि हिंदीतच लिहिले होते तसेच ‘छत्रपती’ हा शब्द व्याकरणदृष्टय़ा ‘छत्रपति’ अशा प्रकारे चुकीचा लिहिण्यात आला होता. साळवी यांनी राज्य शासनाचे भाषा संचालनालय, मध्य रेल्वेचे संबंधित अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार पहिल्यांदा मराठी त्यानंतर हिंदूी व इंग्रजी भाषेत हे नाव लिहिले पाहिजे, असा आग्रहही त्यांनी धरला. चिकाटीने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि मराठी भाषेला अग्रक्रम मिळण्यासह ‘छत्रपती’ हा शब्दही योग्य प्रकारे लिहिला गेला. मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयाच्या वांद्रे येथील नव्या प्रशासकीय इमारतीच्या कोनशिलेवर अशीच चूक झाली होती.
कोनशिलेवर ‘मुंबई उपनगर जिल्हा-बांद्रा’ असे लिहिण्यात आले होते. हा शब्द मराठीत ‘वांद्रे’ असा लिहिला पाहिजे यासाठी साळवी यांनी तेव्हाचे उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांना निवेदन सादर केले. चन्ने यांनी साळवी यांच्या म्हणण्याची दखल घेऊन चुकीची सुधारणा केली आणि ‘मुंबई उपनगर जिल्हा-वांद्रे’ अशी नवीन कोनशिला
बसविण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. मुंबई नागरिक केंद्र या संस्थेचे ते मानद सल्लागार म्हणूनही काम करतात. जहांगीर दाजी मार्ग, जुनी चिखलवाडी येथील महापालिका प्राथमिक शाळेच्या इमारतीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची ताडदेव शाखा होती. मात्र ही इमारत जुनी/धोकादायक झाल्यामुळे येथून हे ग्रंथसंग्रहालय दूरवर हलविण्याचा घाट घालण्यात आला होता. स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांची त्यामुळे गैरसोय होणार होती. याच परिसरात ताडदेव परिसरातच फोर्जेट हिल (दीनानाथ मंगेशकर मार्ग) येथे महापालिकेची एक नवीन इमारत बांधून तयार होती. ग्रंथसंग्रहालय या इमारतीत आणता येऊ शकते यासाठी साळवी यांनी महापालिकेच्या संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला. अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. अखेरीस मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची ताडदेव शाखा या नव्या इमारतीत स्थलांतरित झाली. साळवी यांना एकदा रस्त्यात एक प्लास्टिकची पिशवी (कॅरी बॅग) मिळाली. कचऱ्यात पडलेल्या या प्लास्टिकच्या पिशवीवर भारताचा नकाशा छापलेला होता. भारताच्या नकाशाची अशा प्रकारे झालेली अवहेलना पाहून ते व्यथित झाले. मुंबईचे तेव्हाचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाने हे पोलिसांना कळविले. पोलिसांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून समज दिली आणि नकाशा छापलेल्या त्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा साठा नष्ट करण्यात आला. भाटिया रुग्णालयाजवळ, ग्रॅण्टरोड येथे टपाल कार्यालयाच्या पेटीची दुरवस्था झाली होती. पत्रे व टपाल रस्त्यावर पडलेले असायचे. उंदरांकडून टपाल कुरतडले जायचे.
साळवी यांनी एके दिवशी कामावर न जाता थेट ग्रॅण्टरोड टपाल कार्यालय गाठले. तेथे तसेच नंतर दादर टी.टी. येथील टपाल कार्यालयात जाऊन त्यांनी संबंधितांची भेट घेतली. निवेदन दिले. पंधरा दिवसांनंतर टपाल विभागाचे वरिष्ठ अधिकारी साळवी यांच्या घरी आले. त्यांनी ग्रॅण्टरोड येथील टपाल पेटी बदलत आहोतच पण विभागात अन्यत्र कुठे खराब झालेल्या टपालपेटय़ा असतील त्याही सगळ्या बदलून टाकतोय, असे सांगून त्याची कार्यवाही केली.
‘तू तुझ्या मताशी ठाम असशील आणि अन्याय तुला सहन होत नसेल तर एक सैनिक म्हणून पुढे जा. बरोबर कोणी आहेत की नाही याचा कधीही विचार करू नकोस’ असा वडिलांनी दिलेला सल्ला साळवी यांनी शिरोधार्य मानला आणि आपले काम सुरू ठेवले. हे काम करताना प्रसंगी पदरचे पैसे खर्च होतात, बरे-वाईट अनुभव येतात पण आपले काम आपण प्रामाणिकपणे करत राहायचे, या विचारातून त्यांचे काम सुरूच आहे.
प्रत्येक माणसाने ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती सोडून द्यावी. आपल्यावर सोपविलेले काम मनापासून आणि तळमळीने करावे, असा सल्लाही ते देतात. या सर्व कामांतून अवर्णनीय आणि सात्त्विक आनंद व समाधान मिळते, असे साळवी यांचे म्हणणे आहे.