ठाणे : नारळी पौर्णिमा म्हणजे कोळी समाजाचा महत्वाचा सण. या सणाला समुद्राला नारळ अर्पण करून त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. पारंपरिक सण असूनही आता नारळीपौर्णिमा म्हणजे केवळ नारळ वाहून सण साजरा करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. या सणाला तरूणाईच्यावतीने एक अनोखा रंग दिला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. समाजमाध्यमांवर फोटो, रिल्स पोस्ट करण्यासाठी काही दिवस आधीपासूनच तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.
नारळी पौर्णिमा हा श्रावणातील एक महत्वाचा सण आहे. पावसाळ्यामुळे समुद्रातील मासेमारी पूर्णपणे बंद असते. हा कालावधी संपत असून किनाऱ्यावर असणाऱ्या बोटी समुद्रात मासेमारीसाठी पुन्हा रवाना होत असतात. नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर समुद्राची पूजा करून, त्याला नारळ अर्पण केल्यावर मासेमारीला पुन्हा सुरुवात करण्याचे परंपरा आहे. त्यामुळे कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि व्यवसायात यश मिळावे यासाठी प्रार्थना करतात. या निमित्ताने किनारपट्टीवरील गावांमध्ये पारंपारिक गाणी, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिला पारंपरिक कोळी पेहराव परिधान करून एकत्र येत पारंपारिक गाण्यांवर नृत्य करतात. नारळी पौर्णिमा हा सण केवळ मासेमारी सुरू करण्याचा उत्सव नसून, निसर्गाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. दरम्यान याच पारंपारिक सणाला नव्या तरूणाईच्या आधुनिकतेची जोड मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
या पारंपारिक सणाचे औचित्य साधून अनेक तरूणी कोळी पेहराव करत आहेत. हा पेहराव करण्यासाठी विशिष्ट सौंदर्य सल्लागार करतात. त्यानंतर समुद्र किनारी जाऊन छायाचित्र, रिल्स तयार केले जातात. हे केवळ मनोरंजनासाठी किंवा प्रसिद्धीसाठी केले जात नसून यामार्फत आर्थिक स्त्रोत सुरू करण्यात आला आहे. यामध्ये सौंदर्य सल्लागार, छायाचित्रकारांना वाढती मागणी आहे.
इंस्टाग्राम(instagram), फेसबुकसारख्या(facebook) या समाज माध्यमांवर ‘रिल्स’ म्हणजेच काही सेकंदांची ध्वनिचित्रफित प्रसारित केली जाते. ही केवळ मनोरंजन या हेतूने नसून प्रसिद्धी, व्यवसाय आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी या‘रिल्स’चा वापर केला जात आहे. यासाठी तरुणाई विशेष मेहनत घेताना दिसते आहे. विशेषतः महाविद्यालयीन तरुणांमध्ये आणि नवोदित कलाकारांमध्ये रिल्स बनवण्याचा प्रमाण वाढले आहे. काहीजण यामधून आर्थिक उत्पन्न देखील मिळवत आहेत. विविध नव उद्योगांना व्यक्तींना प्रमोट करण्यासाठी संपर्क करत आहेत.
प्रतिक्रिया
मागील आठवड्यापासूनच कोळी वेशभूषेसाठी तरूणी येत आहेत. तसेच दोन दिवसांपासूनही अनेक तरूणींनी ही वेशभूषा केली आहे.श्रावणी पाटील, सौंदर्य तज्ज्ञ(मेकअप आर्टिस्ट)
प्रतिक्रिया
नारळी पौर्णिमेनिमित्त उरण येथे कोळी पेहरावाचे छायाचित्र काढण्यासाठी गेलो होतो. पारंपरिक सणाचा हा नवीन आर्थिक स्त्रोत निर्माण झाला आहे.सुजय तुळसकर , छायाचित्रकार
मागील काही दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांसह अनेक तरूणी येत आहेत. या तरूणी समाजमाध्यामांवर छायाचित्र काढून प्रसारित करण्यासाठी प्रामुख्याने पोशाख घेऊन जात आहेत. लहान मुलांचे कोळी पोशाख ३०० रूपयांपासून तर तरूणींचे ५०० रूपयांपासून भाड्यांने दिले जात आहेत.रविकांत अग्रहरी, पोशाख विक्रेते