ठाणे : लॉटरी कोणाला लागली? याचे आत्मपरीक्षण गणेश नाईक यांनी करावे. ‘साठी बुद्धी, नाठी’ असे म्हणतात, त्यांचे वय झाले आहे, त्यामुळे ते काय बोलतात हे त्यांनाच माहीत अशी टीका शिंदे गटाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी वन मंत्री गणेश नाईक यांच्यावर केली. जर एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर आता सत्ता आली नसती, त्यामुळे लॉटरी कोणाला लागली ते त्यांनी ठरवावे असेही म्हस्के म्हणाले.

वनमंत्री गणेश नाईक हे १५ ऑगस्टला पालघर येथील एका शासकीय कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी त्यांनी वक्तव्य केले. त्यामध्ये ते म्हणत आहेत, प्रत्येकाचे नशीब असते, लाॅटरी लागते की नाही. पण एकनाथ शिंदेंना लाॅटरी लागली. आनंद आहे त्या गोष्टीचा… पण कमविलेले टिकविता आले पाहिजे असे माझे मत आहे. कसे कमविले, किती कमविले आणि कसे टिकविले यावर जनसामान्यांची नजर असते असे नाईक म्हणाले. ठाण्यात शनिवारी खासदार म्हस्के यांनी नाईक यांच्यावर टीका आहे. एकनाथ शिंदे हे सतत जिंकत आलेले आहेत, मात्र नाईक यांचा पराभव झाला आहे. आता ते पुन्हा निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता, तर आज सत्ता सुद्धा आली नसती असे म्हस्के म्हणाले.

गणेश नाईक भाजपचे नवी मुंबईतील नेते आहेत. परंतु गणेश नाईक आणि शिवसेना शिंदे गटामध्ये विस्तवही जात नसल्याची चर्चा आहे. गणेश नाईक यांनी रोखठोकपणे त्यांची मते मांडत शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करतात. ठाणे शहर हे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. असे असतानाही ठाण्यात येऊन गणेश नाईक यांनी ‘ठाण्यात भाजपाचे कमळ फुलवायचंय!’ असे विधान केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीपदावरही त्यांनी एक वक्तव्य केल्याने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. एकनाथ शिंदे यांना लाॅटरी लागल्याचा उल्लेख नाईकांनी केल्याने आता नाईक आणि शिंदे सेनेत वाद वाढण्याची शक्यता आहे.

मानाची हंडी

टेंभीनाका येथे शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून टेंभीनाका मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी आयोजित केली जाते. या हंडीविषयी म्हस्के म्हणाले की, येथून हंडीला सुरुवात झाली, ही पहिली हंडी जी दूरदर्शनवर दाखवली गेली, ही हंडी आनंद दिघे यांनी सुरू केली होती, आता एकनाथ शिंदे ही परंपरा चालवत आहेत असे म्हस्के म्हणाले.