ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी एक विधान केले असून यानंतर ठाणे जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. त्यावर आता शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देत राऊत यांना इशारा दिला आहे.
आनंद दिघे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वडिलस्थानी मानायचे आणि बाळासाहेब ठाकरे सुद्धा आनंद दिघे यांना आपला सगळ्यात लाडका शिष्य म्हणून मानायचे. असे असताना तू दिघे साहेबांची योग्यता काढतो. एक जिल्हाप्रमुख होते, अरे त्यांनी ठरवलं असत ना ते आमदारही झाले असते आणि खासदारही झाले असते आणि मंत्री झाले असते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नेते बनवले, आमदार बनवले आणि खासदार बनवले, तुझी योग्यता काय आहे, तू राहतो त्या ठिकाणी आतापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकला नाहीस, अशी टिका म्हस्के यांनी केली. आनंद दिघे यांचे नाव घेण्याची राऊत यांची लायकी नाही. त्यांची योग्यता काय आहे, असे म्हणत आनंद दिघे यांनी तुला कशा कशात वाचवलेला आहे हे लोकांसमोर आणू का, अशा शब्दात म्हस्के यांनी राऊत यांच्यावर टिका केली.
तोंड सांभाळून बोल
मागच्या दाराने आमच्या आमदारांच्या जीवावर तू राज्यसभेचा खासदार झालास. धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर टीका करायची, तुझी योग्यता आणि लायकी आहे का, तोंड सांभाळून बोल. तू आतापर्यंत दिघे यांचा नेहमी दुस्वास केला आहे. नेहमी त्यांना पाण्यात बघितल आहेस. तुझ्या एका मुलाखतीमुळे आमच्या दिघेंना टाडा लागलेला आहे, हे आम्ही विसरणार नाही. तोंड सांभाळून बोल, पुन्हा एकदा तुला मी इशारा देतोय. नाहीतर तुझी आम्हाला तुझी योग्यता, तुझी पात्रता आम्हाला दाखवावी लागेल, एवढे लक्षात ठेव, असा इशारा म्हस्के यांनी दिला.
हिंमत असेल तर संजय राऊत यांचे पुतळे जाळा
बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत तुम्ही आनंद दिघे यांचा फोटो लावू नका, असे ठाणे जिल्ह्यात उबाठाच्या नेत्यांना त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. ते लाचार झालेले नेते आहेत, त्यांना आनंद दिघे यांची जर कळकळ असेल, त्यांच्याबद्दल जर आदर असेल तर त्यांना आवाहन करतो की, त्यांनी संजय राऊत यांचा निषेध करावा. ठाणे शहर आणि जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील जनता उबाठाच्या नेत्यांना ठाण्यात फिरून देणार नाही. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांना मानणारे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील आणि तुमची पळताभई थोडी होईल हे लक्षात ठेवा आणि खरोखरच जर तुम्ही आनंद दिघे साहेबांचे शिष्य असाल आणि तुमच्यात हिंमत असेल तर संजय राऊत यांचे पुतळे जाळा, अशी टिका त्यांनी राजन विचारे यांच्यावर केली.
शेंदुर लावल्यानेच आमदार, खासदार
आनंद दिघे यांना नेहमी त्यांनी पाण्यात पाहिले आणि त्यांचा नेहमी अपमान केला. त्यांना एवढा प्रचंड असा मानसिक त्रास द्यायचे. हे लोक त्यांचे जिल्हाप्रमुख पद सुद्धा काढण्याच्या मागे लागले होते. डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाला आनंद दिघे यांचे नाव देणार होतो. परंतु या लोकांनी त्यांचे नाव देऊ दिले नाही. एवढा राग त्यांच्या मनात दिघे यांच्याविषयी होता. झोपडपट्टी, कामगार वस्ती, आदिवासी वस्ती, उच्चभ्रू वस्ती येथे दिघे यांना देव मानतात. एकनाथ शिंदे यांनी शेंदुर लावल्यानेच आमदार, खासदार झाले. मात्र त्यांनी हात काढला आणि तुम्ही आमदार, खासदारकीला पडला आणि आता महापालिका निवडणुकीतही तुम्ही पडाल अशी टिका शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.